कोरोनाकाळात कलाकारांवर नेमके किती कोटी खर्च झाले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:06 AM2021-06-11T04:06:42+5:302021-06-11T04:06:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या कालावधीत मागील वर्षभरात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले; ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या कालावधीत मागील वर्षभरात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले; परंतु या कार्यक्रमांत सहभागी झालेल्या कलाकारांवर नेमके किती कोटी खर्च झाले, याबाबत केंद्राकडून माहिती अधिकारात संभ्रमात टाकणारी माहिती देण्यात आली आहे.
एका प्रश्नाच्या उत्तरात कलाकारांवर ३ कोटी ९७ लाख खर्च झाल्याचे सांगण्यात आले, तर नंतरच्या प्रश्नात हाच आकडा १ कोटी ३७ लाख असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे नेमके किती कोटी खर्च झाले, हा प्रश्न उपस्थित होत असून, तेथील अधिकारी माहिती अधिकाराबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राकडे विचारणा केली होती. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत केंद्रातर्फे किती कार्यक्रमांचे आयोजन झाले, त्यासाठी किती अनुदान मिळाले व कलाकारांवर किती रक्कम खर्च झाली, आदी प्रश्न विचारण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत केंद्रातर्फे विविध राज्यांत १८८ कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यासाठी ८ कोटी २९ लाख ४३ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले व कलाकारांवर ३ कोटी ९७ लाख ९० हजार ५५६ रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले. मात्र आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात बहुतांश कार्यक्रम ऑनलाइन झाले. या कार्यक्रमांमध्ये तीन हजारांहून अधिक कलाकार सहभागी झाले व त्यांच्यावर १ कोटी ३७ लाख ८७ हजार ५०९ रुपये खर्च झाल्याची माहिती देण्यात आली. कलाकारांचा नेमका आकडा देण्यात आला नाही. त्यामुळे कलाकारांवर नेमका किती कोटींचा खर्च झाला, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्मचाऱ्यांकडून केंद्राविरोधात १२ खटले
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रावर तेथील कर्मचाऱ्यांकडून १२ खटले टाकण्यात आले आहेत, तर केंद्राकडून कर्मचाऱ्यांवर एक खटला टाकण्यात आला आहे. या खटल्यासाठी केंद्राकडून वकिलांचे शुल्क व न्यायालयीन खर्चापोटी २ लाख ६ हजार ७५० रुपये खर्च झाले.