स्वत:ला शहरी नक्षलवादी म्हणणं ही अतिशयोक्ती : अभिराम भडकमकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 08:51 PM2019-02-23T20:51:28+5:302019-02-23T20:53:54+5:30
माझ्याजवळ नक्षलवादी विचारांचं पत्रक सापडलं तर मला शहरी नक्षलवादी ठरवलं जाईल का? या प्रेमानंद गज्वींच्या नाट्यसंमेलनातील अध्यक्षीय भाषणावर मान्यवर लेखक, दिर्ग्दशक आणि कलाकारांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. देशात मुळातच भयग्रस्त असं काही वातावरण नाही. नाट्य संमेलनातील अध्यक्षीय पदावरून गज्वींनी स्वत:ला शहरी नक्षलवादी ठरवलं जाईल, असा प्रश्न विचारणं म्हणजे ही एक प्रकारची अतिशयोक्ती आहे, अशी टीका लेखक आणि नाटककार अभिराम भडकमकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अजय परचुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माझ्याजवळ नक्षलवादी विचारांचं पत्रक सापडलं तर मला शहरी नक्षलवादी ठरवलं जाईल का? या प्रेमानंद गज्वींच्या नाट्यसंमेलनातील अध्यक्षीय भाषणावर मान्यवर लेखक, दिर्ग्दशक आणि कलाकारांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. देशात मुळातच भयग्रस्त असं काही वातावरण नाही. नाट्य संमेलनातील अध्यक्षीय पदावरून गज्वींनी स्वत:ला शहरी नक्षलवादी ठरवलं जाईल, असा प्रश्न विचारणं म्हणजे ही एक प्रकारची अतिशयोक्ती आहे, अशी टीका लेखक आणि नाटककार अभिराम भडकमकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
लेखकांना लिहिण्याचं आज तरी मुक्त स्वातंत्र्य आहे. असं कुणी लिहिलं तर त्या लेखकाची सरसकट धरपकड होतेय, असं चित्र अजूनतरी आपल्या भारतात मला दिसलेलं नाही. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या एका महत्त्वाच्या व्यासपीठावरून गज्वींनी असं वक्तव्य करणं अतिशय दुर्दैवी आहे. मुळात काँग्रेसच्या राजवटीतही लेखकांवर आरोप-प्रत्यारोप होत होते. पण कुणाची धरपकड करण्याची घटना घडलेली नाही आणि जरी झालीच तरी भारताची न्यायव्यवस्था योग्य तो निर्णय घेण्यास समर्थ आहे. त्यामुळे गज्वींचं विधान हे केवळ अतिशयोक्ती होती असं मत अभिराम भडकमकर यांनी मांडलं आहे.
मला प्रेमानंद गज्वी यांचं संपूर्ण भाषण आवडलं. त्यांनी प्रायोगिक, व्यावसायिक, बालरंगभूमी, कामगार रंगभूमी या सर्वांचा अगदी सुंदर पद्धतीने आढावा घेतला. शहरी नक्षलवादाबद्दल त्यांनी मांडलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत होतं आणि लेखक म्हणून त्यांना आलेले अनुभव आणि त्यामुळे त्यांनी मांडलेले विचार मांडण्याचा त्यांना पूर्ण हक्क आहे. मला गज्वींच्या बोलण्यावर फक्त एवढंच सांगावंसं वाटतं की कलाकार म्हणून मला तरी अजून असा कधी अनुभव आलेला नाही. मला माझ्या कामामध्ये पूर्ण स्वातंत्र्य आत्तापर्यंत मिळालेलं आहे आणि मी कोणता विचार अंगी बाळगतो किंवा कोणत्या गोष्टीचा पुरस्कार करतो याचा आणि माझ्या कलेचा दुरान्वये संबंध येत नाही. त्यामुळे गज्वींच्या विचारांचा मला एक रंगकर्मी म्हणून आदर आहे. मात्र मला तरी तसा कधी अनुभव आला नाही, असं मत माजी नाट्यपरिषद अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी मांडलं.
आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रेमानंद गज्वींचे विचार नाकारण्यासारखे नाहीयेत. कारण गज्वींनी आजपर्यंत जितकं लिखाण केलंय ते प्रामुख्याने संशोधनात्मक लिखाण केलं आहे. त्यांनी कधीच करमणुकीचं लिखाण केलंलं नाही. त्यांचा विचार हा एकप्रकारे विद्रोही आहे आणि अशाप्रकारचं वातावरण घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर या नाटकांच्या वेळीही होतं ना. लेखकाला नेमकं काय म्हणायचंय, त्याला नेमकं काय मांडायचं आहे हे न समजता विरोध यापूर्वीही केला गेला आहे. त्यामुळे गज्वींनी या अनुभवातून हा विचार मांडला आहे का? हे आधी तपासण्याची गरज आहे. कलेकडे समाजाभिमुख,शोधक वृत्तीने पाहण्याची गरज आहे आणि त्यामुळे यावर गज्वींचं नाट्यसंमेलनातील भाष्य हे विचार करण्यासारखं आहे असं मत ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी मांडलं आहे.
मी गज्वींच्या मताशी सहमत, आपला समाज गोठलेला झालाय : शफाअत खान
सध्याच्या समाजात भयाचं वातावरण आहे या प्रेमानंद गज्वींच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. मुळात प्रश्न विचारायचा नाही, आपल्याला काही वाटलं तर लिहायचं नाही याचं स्वातंत्र्य कुठेतरी हिरावलं आहे आणि हा दबाव काही वरूनच आलाय असं नाहीये, सध्या हे वातावरण समाजातील सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचलेलं आहे. त्यामुळे सध्या रस्त्यावरील माणसालाही कोणती गोष्ट पटली नाही तर सर्रास कायदा हातात घेण्याचे प्रकार वाढत आहेत. ही परिस्थिती आधी नव्हती आणि मुळात ती आपली संस्कृती नव्हती. त्यामुळे समाज सध्या गोठलेल्या मन:स्थितीत आहे आणि जोपर्यंत विचारांचं, लिखाणाचं, वागण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत समाजाचं हे गोठलेपण काही केल्या कमी होणार नाही आणि हे दुर्दैव आहे, असं मत ज्येष्ठ नाटककार शफाअत खान यांनी मांडलं आहे.