२०१५ ला होणारी परीक्षा घेताहेत २०१९ मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 10:30 PM2019-07-13T22:30:53+5:302019-07-13T22:33:24+5:30
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था(नीरी)द्वारे टायपिंग स्टेनो या पदासाठी २०१५ मध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी परीक्षार्थींची निवडही करण्यात आली होती. तेव्हापासून त्या परीक्षेसंदर्भात कुठलीही माहिती संस्थेने दिली नाही. आता पाच वर्षानंतर परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षार्थींना पाठविले आहे. येत्या ३ ऑगस्टला सदर पॉलिटेक्निकमध्ये परीक्षा होणार असल्याने परीक्षार्थी गोंधळले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था(नीरी)द्वारे टायपिंग स्टेनो या पदासाठी २०१५ मध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी परीक्षार्थींची निवडही करण्यात आली होती. तेव्हापासून त्या परीक्षेसंदर्भात कुठलीही माहिती संस्थेने दिली नाही. आता पाच वर्षानंतर परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षार्थींना पाठविले आहे. येत्या ३ ऑगस्टला सदर पॉलिटेक्निकमध्ये परीक्षा होणार असल्याने परीक्षार्थी गोंधळले आहेत.
नीरीसारख्या नामांकित संस्थेकडून परीक्षेचे आयोजन भोंगळ पद्धतीने होत असल्याचा आक्षेप परीक्षार्थींनी घेतला आहे. संस्थेने २०१५ मध्ये स्टेनो या पदासाठी जाहिरात दिली होती. विद्यार्थ्यांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रं नीरीकडे जमा केली होती. कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर २३ जणांची परीक्षेसाठी निवड करण्यात आली होती. त्यांची यादीसुद्धा संस्थेने प्रसिद्ध केली होती. पण परीक्षा कधी होईल, यासंदर्भात कुठलीही माहिती दिली नव्हती. निवड झालेल्या काही परीक्षार्थींनी तेव्हा परीक्षेच्या आयोजनासंदर्भात संस्थेकडे माहितीसुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना दुजोरा मिळाला नाही. त्यामुळे परीक्षार्थींनी याकडे गांभीर्याने घेतले नाही. ते विसरूनही गेले होते. त्यांच्याजवळ परीक्षेसंदर्भातील कागदपत्रेही गहाळ झाली आहेत. पण येत्या १२ जुलै २०१९ रोजी नीरीने विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र पाठविले. त्यानुसार येत्या ३ ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यातील काही परीक्षार्थींचे वय निघून गेले आहे. काही परीक्षार्थींची प्रॅक्टिस सुटलेली आहे. अचानक ध्यानीमनी नसताना परीक्षेचे प्रवेशपत्र आल्यामुळे मिळालेला अवधी अतिशय कमी असल्याने किमान परीक्षा एक ते दीड महिन्यानंतर घेण्यात यावी, अशी परीक्षार्थींची मागणी आहे.