परीक्षा ऑनलाईन, मनस्ताप शिक्षकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 10:43 PM2020-09-20T22:43:23+5:302020-09-20T22:43:52+5:30

जर केवळ अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाईन होणार आहे तर सर्व शिक्षकांना बोलविण्याची आवश्यकता का आहे, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Exam online, annoying teachers | परीक्षा ऑनलाईन, मनस्ताप शिक्षकांना

परीक्षा ऑनलाईन, मनस्ताप शिक्षकांना

Next
ठळक मुद्देअनेक शिक्षकांना कोरोनासंबंधित कामाला लावण्यात आले आहे. नवीन निर्देशांप्रमाणे त्या शिक्षकांनादेखील महाविद्यालयांत रुजू व्हावे लागणार आहे. मात्र त्याच्यासंदर्भात स्पष्ट सूचना आलेल्या नाहीत.


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर विद्यापीठांमध्ये ऑनलाईन परीक्षा होणार असतानादेखील राज्य शासनाने सर्व महाविद्यालयातील शिक्षकांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. कोरोनाचा प्रकोप वाढत असताना या निर्देशांमुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. जर केवळ अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाईन होणार आहे तर सर्व शिक्षकांना बोलविण्याची आवश्यकता का आहे, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने १८ सप्टेंबर रोजी नवा शासन निर्णय जाहीर केला. विद्यापीठे आणि कॉलेजेस येथे शंभर टक्के उपस्थिती राखली जावी असे आदेशांमध्ये म्हटले आहे. १ ते ३१ ऑक्टोबर या काळात अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार असून नोव्हेंबरमध्ये निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे प्राध्यापक आणि कर्मचारी यांची शंभर टक्के उपस्थिती आवश्यक असल्याचे शासनाने म्हटले आहे. शासनाचा आदेश पाहता महाविद्यालयांनी घरुन ऑनलाईन काम करणाऱ्या शिक्षकांना त्वरित रुजू होणाच्या सूचना दिल्या आहेत.
यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ घेणार असून सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. अशा स्थितीत मूल्यांकनाचेदेखील काम जास्त राहणार नाही. अशा स्थितीत सर्व वर्षांना शिकविणाºया शिक्षकांना बोलविण्याची काहीच गरज नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

कोरोना झाला तर जबाबदार कोण
अनेक संलग्नित महाविद्यालयांत शिक्षकांना एकाच ठिकाणी दाटीवाटीने बसावे लागते. सध्या शिक्षकांना आळीपाळीने बोलविण्यात येत आहे. मात्र सर्वांना एकत्रित बोलविले तर फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. अशा स्थितीत शिक्षकांना कोरोना झाला तर त्याचा जबाबदार कोण राहील असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

अध्यापन तर नियमित सुरूच
कोरोना काळात अध्यापन नियमित सुरू असून विद्यार्थ्यांचे आॅनलाईन वर्ग होत आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम मागे राहण्याची शक्यता नाही. विशेषत- अभियांत्रिकी महाविद्यालयांत तर आॅनलाईन सरावावर जास्त भर दिला जात आहे. अशा स्थितीत अंतिम वर्षाच्या निकालासाठी सर्व शिक्षकांना कामावर बोलविणे हा अन्यायच असल्याची शिक्षकांमध्ये भावना आहे.

वेतनाचे काय करणार
सद्यस्थितीत बहुतांश खासगी महाविद्यालयांत शिक्षकांच्या वेतनात कपात करण्यात आली आहे. जर शिक्षकांना १०० टक्के प्रमाणात दररोज बोलविले, तर त्यांना पूर्ण वेतन देणार का असा सवालदेखील शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

शिक्षक संघटनांकडून मौन
कोरोना काळात शिक्षकांना १०० टक्के बोलविण्याच्या निर्णयावरुन शिक्षकांमध्ये रोष आहे. मात्र शिक्षक संघटनांनी मात्र यासंदर्भात मौन बाळगले आहे. या संघटनांच्या भूमिकेवर शिक्षकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 

Web Title: Exam online, annoying teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.