नागपूर विद्यापीठाची ‘लेटलतिफी’, ६ महिन्यांच्या अभ्यासक्रमाचा दीड वर्षानंतरही निकाल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 03:32 PM2021-12-23T15:32:46+5:302021-12-23T15:44:10+5:30
नागपूर विद्यापीठाच्या निरंतर प्रौढ शिक्षण विभागातर्फे २०१८ साली कुटुंब समुपदेशन या विषयावर सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. पहिली बॅच सुरळीतपणे उत्तीर्ण झाली; परंतु दुसऱ्या बॅचच्या मागे सुरुवातीपासूनच अडथळे लागले.
योगेश पांडे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लेटलतिफीचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या २०१९ च्या बॅचमधील ५०हून अधिक विद्यार्थी मागील दीड वर्षापासून निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. अद्यापही विभागाने निकाल जाहीर केलेले नसून, विद्यार्थ्यांच्या कुठल्याच प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. प्रवेश घेतल्यावर सव्वादोन महिन्यांच्या कालावधीनंतरदेखील विद्यार्थी प्रमाणपत्रासाठी पायपीट करत आहेत.
नागपूर विद्यापीठाच्या निरंतर प्रौढ शिक्षण विभागातर्फे विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविण्यात येतात व त्यांना विद्यार्थ्यांची संख्यादेखील चांगली असते. विभागातर्फे २०१८ साली कुटुंब समुपदेशन या विषयावर सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. पहिली बॅच सुरळीतपणे उत्तीर्ण झाली; परंतु दुसऱ्या बॅचच्या मागे सुरुवातीपासूनच अडथळे लागले.
शहरातील तीनहून अधिक महाविद्यालयांमध्ये ऑगस्ट २०१९ मध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरू झाला व फेब्रुवारी महिन्यात परीक्षा अपेक्षित होती; परंतु अभ्यासक्रमच न संपल्याने ती परीक्षा वेळेत झालीच नाही. त्यानंतर मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला व सर्वच परीक्षा खोळंबल्या.
विद्यापीठाने ऑनलाइन माध्यमातून इतर परीक्षा घेतल्या व त्याच धर्तीवर या अभ्यासक्रमाचीदेखील जून २०२० मध्ये ऑनलाइन परीक्षा घेतली. विद्यार्थ्यांना ‘लिंक’च्या माध्यमातून प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्या व त्याची उत्तरे ठरावीक कालावधीत त्यावर ‘अपलोड’ करायची होती. मात्र, अनेकांना तांत्रिक अडथळ्यांमुळे ही बाब जमली नाही. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता विभागाने उत्तरपत्रिकेची ‘हार्डकॉपी’ मागितली. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांच्या माध्यमातून उत्तरपत्रिका जमा केल्या; परंतु तेव्हापासून अद्यापही निकाल जाहीर झालेला नाही. याबाबत विद्यार्थ्यांची नुसती पायपीट होत असून, विभाग व अधिकारी एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करत आहेत. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
संकेतस्थळावर माहितीच नाही
संबंधित अभ्यासक्रमाला शहरातील काही पोलीस अधिकारी, वकील, पत्रकार, डॉक्टर, समुपदेशक आदींनी नोंदणी केली होती; परंतु त्यांनादेखील निकालाची कुठलीही माहिती कळू शकलेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे मोठमोठे दावे करणाऱ्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निरंतर शिक्षण विभागाच्या परीक्षांबाबत काहीच माहिती उपलब्ध नाही.