कर्मचारी व कार्यकर्त्यांची परीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:26 AM2020-12-04T04:26:35+5:302020-12-04T04:26:35+5:30
विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीने प्रशासनातील कर्मचारी व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची अक्षरशः परीक्षाच घेतली. सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीच्या ...
विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीने प्रशासनातील कर्मचारी व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची अक्षरशः परीक्षाच घेतली. सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. सुरुवातीला टपालपत्रिकांसह एकूण मतदान असलेल्या १ लाख ३२ हजार ९२८ मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. ही प्रक्रियाच १.३० वाजेपर्यंत चालली. त्यानंतर दुपारी २.३० वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. २८ टेबलवर प्रत्येकी १ हजार मतांची मोजणी झाली. पहिल्या फेरीची मतमोजणी चार तासाहून अधिक काळ चालली व ७.१५ वाजता पहिल्या फेरीचे निकाल घोषित करण्यात आले, तर रात्री ९.१५ वाजता दुसऱ्या फेरीचे निकाल घोषित झाले. रात्री उशिरापर्यंत प्रशासनातील सर्व कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सातत्याने काम करीत होते. खऱ्या अर्थाने सर्वांची ही परीक्षाच ठरली. अनेकांनी मतमोजणीच्या संथगतीवर नाराजीदेखील व्यक्त केली.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. विशेष म्हणजे प्रत्येकाजवळ असलेल्या अधिकृत प्रवेशपत्रिका तपासण्यात येत होत्या. शिवाय परिसरात कुणी मास्क न घालता दिसला तर त्याला तातडीने टोकण्यात येत होते.
कही खुशी, कही गम
पदवीधरचा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानण्यात येतो. मात्र पहिल्या तीन फेऱ्याअखेरीस भाजपची पिछेहाट कायम असल्याने भाजपच्या गोटात निराशेचे वातावरण होते. तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये उत्साहाची लाट आली होती. अनेक कार्यकर्त्यांनी तर विभागीय क्रीडा संकुलासमोर रात्री १० नंतर एकत्रित येत आनंदोत्सवदेखील साजरा करण्यास सुरुवात केली.
सोशल मीडियावर फेक आकड्यांना उधाण
मतमोजणीच्या दिवसभर सोशल मीडियावरील विविध आकडेवारीमुळे राजकीय वर्तुळासह सामान्यांमध्ये संभ्रम वाढीस लागला होता. पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण व्हायच्या अगोदरच सोशल मीडियावर दुसऱ्या फेरीत अमूक उमेदवाराने आघाडी घेतल्याचे संदेश फिरत होते. प्रशासनातर्फे अखेर यासंदर्भात स्पष्टोक्ती करण्यात आली. परंतु दिवसभर फेक आकड्यांनीदेखील सर्वांची परीक्षाच घेतली.