शिकाऊ वाहनचालकाची संगणकावर परीक्षा
By admin | Published: April 18, 2015 02:30 AM2015-04-18T02:30:16+5:302015-04-18T02:30:16+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणमध्ये २० एप्रिलपासून शिकाऊ वाहनचालकांची संगणकावर परीक्षा घेण्यात येणार आहे.
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणमध्ये २० एप्रिलपासून शिकाऊ वाहनचालकांची संगणकावर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत संगणकाने विचारलेल्या १५ प्रश्नांपैकी ९ प्रश्नांची अचूक उत्तरे नोंदविणाऱ्या उमेदवारालाच शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) मिळेल. शहर आरटीओ कार्यालयाच्या तुलनेत तब्बल पाच वर्षांनंतर ही प्रणाली ग्रामीण आरटीओ कार्यालयात सुरू होत आहे.
वाहनचालकाने वाहतूक नियमांचा अभ्यास करावा, त्यांना वाहतूक नियमाची माहिती व्हावी, वाहतूक चिन्हांची ओळख व्हावी, यासाठी १२ डिसेंबर २०११ पासून आरटीओ (शहर) कार्यालयाने लर्निंग लायसन्ससाठी संगणकीय परीक्षा सुरू केली. त्याच्यापाठोपाठ उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्वमध्ये सुरू झाली. परंतु ग्रामीण आरटीओ कार्यालयामध्ये ही चाचणी परीक्षा घेण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. अखेर उशिरा का होईना, संगणक परीक्षा सुरू करण्याचे निर्देश आले, सोबतच आवश्यक साहित्यही उपलब्ध झाले.
८ मिनिटांत द्यावी लागणार १५ प्रश्नांची उत्तरे
लर्निंग लायसन्स संगणक परीक्षेसाठी २२ संगणक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यात प्रत्येकाला ८ मिनिटांचा वेळ देण्यात येईल. या वेळात १५ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. त्यापैकी ९ अचूक उत्तरे देणाऱ्या उमेदवाराला उत्तीर्ण म्हणून घोषित करण्यात येईल. विशेष म्हणजे, प्रत्येक संगणकावरील प्रश्नावली वेगवेगळी राहील. हे प्रश्न इंग्रजी व मराठी भाषेत असतील. उमेदवारांसमोर प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय उपलब्ध असणार आहे. कार्यालयाच्या दैनंदिन कामाची व्याप्ती व वीज भारनियमनाचे वेळापत्रक लक्षात घेऊन या प्रणालीतून दररोज सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत चाचणी घेता येणार आहे. या वेळेतच उमेदवारांना शिकाऊ परवान्याच्या चाचणीसाठी यावे लागणार आहे. (प्रतिनिधी)