उपराजधानीत जीव धोक्यात घालून पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 10:09 AM2020-07-31T10:09:01+5:302020-07-31T10:11:13+5:30

नागपूर शहरात होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी करण्यासाठी घरोघरी जाणाऱ्या परिचारिकांना कुठल्याही स्वरूपाची सुरक्षा साधने महापालिकेकडून उपलब्ध करण्यात आलेली नाहीत.

Examination of life-threatening positive patients in Nagpur | उपराजधानीत जीव धोक्यात घालून पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी

उपराजधानीत जीव धोक्यात घालून पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी

Next
ठळक मुद्देमनपाकडून परिचारिकांना सुरक्षेची साधने उपलब्ध नाहीतआरोग्य विभागात नियोजनाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्गामुळे खासगी व सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, परिचारिका तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात संसर्गाची लागण झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे असतानाही नागपूर शहरात होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी करण्यासाठी घरोघरी जाणाऱ्या परिचारिकांना कुठल्याही स्वरूपाची सुरक्षा साधने महापालिकेकडून उपलब्ध करण्यात आलेली नाहीत. यामुळे त्यांना जीव धोक्यात घालून तपासणी करावी लागत आहे. नागपूर शहर व जिल्ह्यात संसर्गित रुग्णांची संख्या पाच हजारांच्या जवळ गेली आहे. तर मृत रुग्णांची संख्या शंभराहून अधिक झाली आहे. दुसरीकडे यात दररोज तीनशेहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने मेयो, मेडिकल रुग्णालयावरील भार वाढला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता संसर्गित रुग्णांना होम क्वारंटाईन केले जात आहे. या रुग्णांची तपासणी करण्यासाठी परिचारिका त्यांच्या घरी जात आहेत. परंतु त्यांना महापालिकेने सुरक्षा किट उपलब्ध केलेली नाही. रबरी हॅण्डग्लोव्हज, एन-९५ मास्क, सॅनिटायझर उपलब्ध केले नसल्याने संसर्गाचा धोका असल्याने परिचारिका दहशतीत काम करत आहेत.

मेहंदी लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हॅण्ड ग्लोव्हजचा वापर
महापालिकेच्या आरोग्य विभागाने पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी करण्यासाठी घरोघरी जाणाऱ्या परिचारिकांना रबरी हॅण्ड ग्लोव्हज उपलब्ध केले नसल्याने मेहंदी लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हॅण्ड ग्लोव्हजचा वापर या परिचारिका करीत आहेत. असे करणे धोकादायक आहे.

रिक्त जागा असूनही संधी का नाही?
महापालिकेत आरोग्य विभागातील पाचशेहून अधिक पदे रिक्त आहेत. यात तीनशेहून अधिक परिचारिकांची पदे आहेत. दुसरीकडे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून २५० कंत्राटी परिचारिका काम करतात. त्यांना कायम का केले जात नाही, हा संशोधनाचा विषय आहे. परिणामी त्यांना आठ ते दहा हजार रुपये अशा तुटपुंज्या मानधनात कोरोना कालावधीत जोखमीचे काम करावे लागत आहे.

आरोग्य विभागात नियोजनाचा अभाव
महापालिकेच्या आरोग्य विभागात नियोजन व समन्वयाचा अभाव आहे. कर्मचारी व अधिकारी यांना मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी वेळोवेळी काम पडते. परंतु अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही यामुळे वेळीच उपाययोजना करता येत नाहीत. काम करताना अडचणी येतात, अशी माहिती आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली.

 

Web Title: Examination of life-threatening positive patients in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.