रणरणत्या उन्हात विद्यार्थ्यांची ‘अग्नी’परीक्षा
By आनंद डेकाटे | Published: May 31, 2024 09:12 PM2024-05-31T21:12:45+5:302024-05-31T21:12:55+5:30
- विद्यापीठाचे परिपत्रक जारी, परीक्षा केंद्रांमध्ये लागले कुलर
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे सध्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा सुरू आहेत. दुसरीकडे दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. सकाळपासून उष्णतेची लाट उसळली आहे. या स्थितीत विद्यार्थ्यांना साधने आणि सुविधा नसलेल्या केंद्रांवर परीक्षा द्याव्या लागत आहेत. सकाळच्या सत्रात थोडा दिलासा मिळतोय, पण दुपारच्या सत्रातील परीक्षा ‘अग्नी’ परीक्षेपेक्षा कमी नाही.
पारा ४५ अंशांवर आहे. सकाळपासूनच रस्त्यावर शांतता आहे. या स्थितीत विद्यापीठाकडून परीक्षा घेतल्या जात आहेत. परीक्षेसाठी विद्यापीठाने चार जिल्ह्यांत सुमारे दीडशे केंद्रे स्थापन केली आहेत. सकाळच्या सत्रात थोडा दिलासा मिळेल, पण दुपारी अडीच वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेत एक हात लिहितो आणि दुसरा घाम पुसतो, अशी अवस्था आहे. अनेक केंद्रांवर सुविधांचा अभाव आहे. कूलरबद्दल विसरू नका, एका खोलीत फक्त एक किंवा दोन पंखे बसवलेले आहेत. पंख्यांची गरम हवा आगीच्या कडकडाटापेक्षा कमी नाही.
दरम्यान शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे एक परिपत्रक जारी करण्यात आले. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रफुल्ल साबळे यांनी या परिपत्रकाच्या माध्यमातून प्राचार्यांना निर्देश दिले आहेत. यामध्ये उन्हापासून वाचण्यासाठी केंद्रांमध्ये कुलरची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्रांमध्ये आता कुलर लावण्यात आले आहेत.
- असे आहेत विद्यापीठाचे निर्देश
- प्रत्येक वर्गखोलीत आसन व्यवस्था ही विद्यापीठाच्या नियमानुसार व प्रशस्त असावी.
- शक्यतोवर परीक्षा केंद्राची व्यवस्था महाविद्यालयाच्या तळमजल्यावर करण्यात यावी.
- विद्यार्थ्यांकरिता शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
- वर्ग खोल्यांमध्ये पंख्यांची व्यवस्था करावी, नादुरुस्त असल्यास तातडीने दुरुस्त करावे
- उन्हाची तीव्रता लक्षात घेता आपल्या स्तरावर कुलरची व्यवस्था करावी
- आजारी, दिव्यांग व गरोदर महिला विद्यार्थिनींसाठी आसनव्यवस्था चांगली करावी
- तडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात यावी.