परीक्षा ओळखपत्रांसाठी विद्यार्थ्यांची धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:10 AM2017-10-24T00:10:05+5:302017-10-24T00:10:44+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीकॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारचा दिवस अक्षरश: धावपळीचा ठरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीकॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारचा दिवस अक्षरश: धावपळीचा ठरला. परीक्षा सुरू होण्याच्या ऐन एक दिवस अगोदर ओळखपत्रासाठी त्यांची पायपीट सुरू होती. महाविद्यालयांनी अगोदर ओळखपत्रे डाऊनलोड का केली नाहीत, असा प्रश्न विद्यापीठाकडून करण्यात आला आहे, तर विद्यापीठाने अनेक ओळखपत्रांमध्ये चुका केल्या असल्याचा आरोप महाविद्यालयांकडून करण्यात आला आहे. मात्र याचा नाहक मनस्ताप विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.
विद्यापीठातर्फे परीक्षेच्या २ ते ३ आठवडे अगोदरच ‘आॅनलाईन’ परीक्षा ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येते, असे दावे करण्यात येतात. यंदादेखील अनेक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना अगोदरच ओळखपत्र मिळाले. मात्र बीकॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मात्र ओळखपत्रासाठी परीक्षेच्या पूर्वसंध्येपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. अनेक विद्यार्थ्यांची ओळखपत्रे ‘डाऊनलोड’ होत नसल्याचे महाविद्यालयांतर्फे सांगण्यात आले. तर बºयाच विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रांमध्ये चुका असल्याचे दिसून आले. त्यामुळे परीक्षा भवनात विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. शंभरहून अधिक विद्यार्थी ओळखपत्राच्या प्रतीक्षेत होते.
महाविद्यालयांना १८ आॅक्टोबररोजी ‘रोल लिस्ट’ पाठविली होती. त्या आधारे त्यांना संबंधित संकेतस्थळावरून परीक्षा ओळखपत्र ‘डाऊनलोड’ करायचे होते. मात्र महाविद्यालयांनी वेळेवर ते काम केले नाही. सोबतच विद्यार्थ्यांची माहिती महाविद्यालयांनी चुकीची दिली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावरच परीक्षा ओळखपत्र तयार करण्यात आले, अशी माहिती परीक्षा विभागातील सूत्रांनी दिली.
महाविद्यालयांनी तक्रार का केली नाही ?
यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांना संपर्क केला असता, महाविद्यालयांकडून एकही अधिकृत तक्रार आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अगोदरच ओळखपत्र ‘डाऊनलोड’ करण्याची सुविधा असतानादेखील महाविद्यालये वेळेवरच काम करतात. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. जर ओळखपत्रांमध्ये त्रुटी होत्या, तर महाविद्यालयांनी तक्रार का केली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, जर विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रात त्रुटी असतील, तर त्या लगेच सुधारण्यात येतील, असेदेखील त्यांनी सांगितले.