परीक्षा विभागाचे ‘मिशन विंटर’
By admin | Published: September 24, 2015 03:29 AM2015-09-24T03:29:15+5:302015-09-24T03:29:15+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल यंदा नको तितके लांबले व परीक्षा विभागावर टीकेची झोड उठविण्यात आली.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल यंदा नको तितके लांबले व परीक्षा विभागावर टीकेची झोड उठविण्यात आली. परंतु येणाऱ्या हिवाळी परीक्षांमध्ये कमीतकमी त्रुटी राहाव्यात यासाठी विभागाची जोरदार तयारी सुरू आहे. हिवाळी परीक्षा सुरू व्हायला अजून अवकाश असला तरी, अधिकाऱ्यांच्या बैठकी मात्र नियमितपणे सुरू असून एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे.
यंदाच्या हिवाळी परीक्षांपासून सर्व परीक्षांचे मूल्यांकन ‘आॅनलाईन’ पद्धतीने होणार आहे. परीक्षा झाल्यावर उत्तरपत्रिकांचे ‘स्कॅनिंग’ करण्यात येईल व ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन करण्यात येईल. ‘आॅनलाईन’ मूल्यांकनामुळे निकाल लवकर लागतील व फेरमूल्यांकनाची प्रक्रिया गतिमान होईल, असा प्रशासनाचा दावा आहे. परंतु ‘आॅनलाईन’ मूल्यांकनासाठी परीक्षा भवनात सर्व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तितक्या प्रमाणात संगणक तसेच ‘स्कॅनर्स’ची व्यवस्था करावी लागणार आहे. शिवाय सर्व गुणदेखील ‘आॅनलाईन’च भरावे लागणार असल्यामुळे मूल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकांना त्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे ठरणार आहे. बऱ्याच अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर झाले असून यात बदल करावे लागणार नाहीत, अशी दक्षता घेण्यात आली आहे, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी यांनी दिली.(प्रतिनिधी)