डमी परीक्षा, डमी पोस्ट... सगळीच हेराफेरी; उमेदवारांना २० लाखांचा गंडा
By योगेश पांडे | Published: March 6, 2023 06:05 PM2023-03-06T18:05:00+5:302023-03-06T18:08:35+5:30
सिनेस्टाईल फसवणूक, पोलिसदेखील अचंबित
नागपूर : एखाद्या चित्रपटाचे कथानक शोभेल अशा पद्धतीने धाराशिव जिल्ह्यातील येथील एका आरोपीने सरकारी नोकरीची डमी परीक्षा घेण्याची जाहिरात करत उमेदवारांना २० लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातला. एका उमेदवाराच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून यात आणखी अनेक उमेदवार फसले गेल्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे पोलिसदेखील अचंबित झाले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
विजय राजेन्द्र रणसिंग (३२, नरसाळा, ता. कंमळ, जि. धाराशिव) असे आरोपीचे नाव आहे. ४ मार्च रोजी आरोपी विजय पटवर्धन या नावाने कोतवाली पोलीस ठाण्यात गेला. सर्वोच्च न्यायालय समितीचा डेस्क व सर्वेक्षण अधइकारी असल्याची बतावणी करत त्याने ५ मार्च रोजी आदर्श विद्यामंदिर येथे ५ मार्च रोजी लिपीक वर्ग अ,ब व ड तसेच शिपाई पदासाठी २० उमेदवारांची परीक्षा आयोजित करायची असल्याचे सांगितले. त्याने दोन होमगार्ड उपलब्ध करून देण्याबाबत पत्र दिले. मात्र त्या पत्राबाबत शंका आल्याने पोलीस ठाण्यातील उमेदवारांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकूंद ठाकरे यांना ही माहिती दिली.
आदर्श विद्या मंदिरच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनीदेखील पोलीस ठाण्यात येऊन त्यांना मिळालेल्या पत्राबाबत शंका व्यक्त केली. पोलिसांनी दोन्ही पत्राविषयी जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ व इतर ठिकाणी चौकशी केली असता अशा प्रकारीच कोणती संस्थाच नसल्याची बाब समोर आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली असता त्याने बनावट प्रवेशपत्र तयार केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
अनेक उमेदवारांची फसवणूक
चौकशीदरम्यान त्याने यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातून एकुण २० उमेदवारांकडुन नोकरी लावून देण्याच्या बदल्यात २० लाख रुपये घेतल्याची कबुली दिली. मात्र ही संख्या याहून अधिक असल्याची शक्यता आहे.