कडक बंदोबस्तात होणार परीक्षा, भरारी पथक ठेवणार नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:08 AM2021-03-21T04:08:40+5:302021-03-21T04:08:40+5:30
आशिष दुबे नागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२ वी च्या होणाऱ्या परीक्षेत बोर्डाकडून कसलीही कमतरता ...
आशिष दुबे
नागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२ वी च्या होणाऱ्या परीक्षेत बोर्डाकडून कसलीही कमतरता ठेवली जाणार नाही. कडक बंदोबस्तात आणि भरारी पथकांच्या देखरेखीत या परीक्षा काटेकोरपणे होतील, अशी माहिती बोर्ड अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.
बोर्डाच्या परीक्षा पॅटर्नची शनिवारी घोषणा झाल्यावर पाटील यांनी ‘लोकमत’शी खास बातचीत केली. ते म्हणाले, शाळा व महाविद्यालयांना बोर्डाकडून प्रश्नपत्रिका पाठविल्या जातील. प्रश्नपत्रिकांसोबत विभागीय कार्यालयांमधील अधिकाऱ्यांनाही पाठविले जाईल. पेपर संपेपर्यंत हे अधिकारी शाळा व महाविद्यालयात राहतील. याशिवाय गोपनीयता कायम राहावी यासाठी प्रत्येक शाळेमध्ये बोर्डाकडून पर्यवेक्षक व परीक्षा अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. परीक्षेवर नजर ठेवण्यासाठी भरारी पथकांचे गठन केले जाईल. कॉपी रोखण्यासाठी कॉपी निर्मूलन मोहीम हाती घेतली जाईल.
एखाद्या शाळेत अथवा महाविद्यालयात परीक्षा काळात गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांवर आणि नियुक्त करण्यात आलेल्या परीक्षा अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. ज्या विषयाचा पेपर असेल, त्या विषय शिक्षकाला केंद्रावर येता येणार नाही. याचे उल्लंघन झाल्यास संबंधित शिक्षकाविरुद्ध कारवाई केली जाईल. परीक्षेचे आयोजन, घ्यावयाची काळजी यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. प्राचार्य आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परीक्षेच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली जाईल.
...
कोविड प्रोटोकॉलचे पालन होणार
सर्व केंद्रांवर कोविड संक्रमण रोखण्यासाठी दिलेल्या नियमांचे पालन केले जाईल. यानुसार बैठक व्यवस्था केली जाईल. विद्यार्थ्यांच्या तुलनेत बैठक व्यवस्था अपुरी पडत असल्यास जवळच्या शाळेमध्ये ही व्यवस्था केली जाईल.
...
शाळेतील शिक्षक घेणार परीक्षा
पाटील यांनी दिलेल्या महितीनुसार, परीक्षा काळात केंद्रावर बाहेरील शिक्षकांची नियुक्ती न करता त्याच शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांची नियुक्ती केली जाईल. परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या शिक्षकांसाठी स्वतंत्र दिशानिर्देश दिले जातील.
...