केस, नख सोडल्यास प्रत्येक अवयवावर क्षयरोगाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:56 PM2020-02-24T12:56:30+5:302020-02-24T12:56:49+5:30
शरीरावरील केस आणि नख सोडल्यास प्रत्येक अवयव टीबीच्या विळख्यात येऊ शकतो. २४ फेब्रुवारी हा दिवस क्षयरोग निवारण दिन म्हणून पाळला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला मेडिकलच्या श्वसन रोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगात एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोक क्षयरोगाच्या विळख्यात आहेत. या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूचा विचार केल्यास एचआयव्ही एड्सनंतर सर्वात घातक हे ‘इन्फेक्शन’ आहे. ‘टीबी’ हा ‘मायकोबॅक्टेरिया’ या प्रकारच्या जिवाणूंमुळे होतो. साधारणपणे हा जिवाणू फुफ्फुसांना आपल्या विळख्यात घेतो. विशेष म्हणजे, शरीरावरील केस आणि नख सोडल्यास प्रत्येक अवयव टीबीच्या विळख्यात येऊ शकतो.
२४ फेब्रुवारी हा दिवस क्षयरोग निवारण दिन म्हणून पाळला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला मेडिकलच्या श्वसन रोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
डॉ. मेश्राम म्हणाले, क्षयरोग हा दोन प्रकारचा असतो. सुप्त (लेटेंट) व सक्रिय (अॅक्टिव्ह). सुप्त टीबीमध्ये जीवाणू शांत राहतो आणि लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र यातून सक्रिय टीबीमध्ये परिवर्तन होण्याची १० टक्के शक्यता असते. सक्रिय टीबीमध्ये प्रतिकारशक्ती या जीवाणूला पसरण्यापासून थांबवू शकत नाही परिणामी व्यक्ती आजारी पडतो. योग्य उपचार न केल्यास टीबी प्राणघातक ठरू शकतो.
असा पसरतो क्षयरोग
क्षयरोग हा खोकल्यातून किंवा शिंकण्यातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचतो. धूम्रपान करणाऱ्यांना, मधुमेह किंवा एचआयव्ही, एड्सबाधिताना सक्रिय टीबी होतो. दोन किंवा तीन आठवड्यापर्यंत खोकला, थुंकीतून रक्त येणे, सायंकाळच्यावेळी ताप येणे, भूक आणि वजन कमी होणे, थकावट वाटणे, वारंवार बद्धकोष्ठता किंवा हगवण लागणे आदी लक्षणे आहेत.
सर्वाधिक धोका मधुमेही, एचआयव्हीबाधितांना क्षयरोग रुग्णाच्या संपर्कात येणारा मधुमेहींना, एचआयव्हीबाधितांसह कुपोषिताना, स्टेरॉईड्स घेणाऱ्यांना, दारूचे व्यसन असणाºयांना या रोगाचा धोका जास्त असतो. वैद्यकीय विद्यार्थी, परिचारिका आणि डॉक्टरांनाही याचा धोका संभवतो.
निदानासाठी विविध तपासण्या
योग्य वैद्यकीय तपासणीसोबतच छातीचा एक्स-रे, पोटाची सोनोग्राफी किंवा पोटाचा सीटी स्कॅन, शरीरात असलेले द्रव्याचे तपासणीतून क्षयरोगाचे निदान केले जाते. ‘टीबी बेकिलस’ दिसणे हे एक मानक परीक्षण आहे. मात्र प्रत्येक प्रकरणात हे शक्य नाही. टीबी जीवाणू, ‘लिम्फ नोड’साठी ‘अॅस्पिरेशन सिटोलॉजी’, थुंकीची चाचणी, आणि ‘टिश्यू बायोप्सी’ केली जाते. ‘क्वांटिफॉर्म टीबी गोल्ड टेस्ट’ आणि अन्य ‘इम्यूनोलॉजिकल टेस्ट’ही उपयोगी पडतात.