कोरोनाबाधितांवर रेमडेसिवीर इंजेक्शनचा अतिरेक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:07 AM2021-04-06T04:07:51+5:302021-04-06T04:07:51+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे कोरोनाबाधितांचे संसर्गाचे दिवस कमी न झाल्याचे व गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचे प्राण वाचविण्यात ...
सुमेध वाघमारे
नागपूर : रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे कोरोनाबाधितांचे संसर्गाचे दिवस कमी न झाल्याचे व गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचे प्राण वाचविण्यात हे औषध परिणामकारक आहे किंवा नाही हे सांगणे कठीण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. परंतु नागपुरातील तज्ज्ञांच्या मते, पहिल्या पाच दिवसात विशेषत: रेमडेसिवीर दिल्यामुळे रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. यात आता रेमडेसिवीर इंजेक्शनचा अतिरेकी वापर होत असल्याच्या काही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी आहेत.
‘डब्ल्यूएचओ’ने ‘सॉलिडॅरिटी ट्रॉयल’दरम्यान ‘रेमडेसिवीर’,‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’, ‘ऑटो-इम्युन ड्रग इन्टरफेरॉन’ आणि ‘एचआयव्ही’वरील ‘लोपिनावीर’ व ‘रिटोनावीर’ या औषधांचा समावेश केला. ३० वेगवेगळ्या देशांत ५०० रुग्णालयांत ११,२६६ प्रौढ रुग्णांवर या चार औषधांचे परीक्षण केले. यात या औषधी रुग्णाचा जीव वाचविण्यास आणि संसर्गाचे दिवस कमी करण्यास प्रभावी ठरत नसल्याचे सामोर आले. या निष्कर्षाचे पुनरावलोकन व्हायचे आहे, असेही यात म्हटले. परंतु सध्या तरी कोविडवर दुसरे कुठलेही औषध उपलब्ध नाही. अशा स्थितीत रेमडेसिवीरचा थोडा जरी फायदा होत असल्यास त्याचा वापर करायला हवा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु आता रेमडेसिवीरचा अतिरिक्त वापर होत असल्याच्या तक्रारीने एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
- रेमडेसिवीर पाच दिवसांपर्यंत देता येते - डॉ. मेश्राम
वरिष्ठ श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. सुशांत मेश्राम यांनी सांगितले की, सौम्य लक्षणांकडून गंभीर लक्षणांकडे जाणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांना पहिल्या पाच दिवसात रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यास त्यांचा चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले आहे. हे इंजेक्शन दरदिवशी एक यानुसार पाच दिवस देता येते. परंतु इंजेक्शन देऊनही रुग्ण गंभीर होत असल्यास, उपचार करणारे डॉक्टर इंजेक्शनचा डोस वाढवू शकतात. जास्तीत जास्त दहा दिवसांपर्यंत इंजेक्शन देता येते. परंतु मूत्रपिंडाचा विकार असलेल्या रुग्णांवर या इंजेक्शनचा सांभाळून वापर करायला हवा. एका अभ्यासातून असे समोर आले की, १० दिवस रेमडेसिवीर दिलेल्या रुग्णांमध्ये ‘अॅक्युट रिस्पेक्टरी फेल्युअर’चे प्रमाण साधारण २६ टक्के, तर पाच दिवस रेमडेसिवीर दिलेल्या रुग्णांमध्ये ‘अॅक्युट रेस्पिरेटरी फेल्युअर’चे प्रमाण साधारण १३ टक्के आढळून आले.
- जीव वाचविण्यासाठीच रेमडेसिवीर दिले जाते - डॉ. देशमुख
ज्येष्ठ फिजिशियन डॉ. जय देशमुख म्हणाले, सध्या कोविडवर ‘अँटिव्हायरल ड्रग्ज्’ उपलब्ध नाहीत. अशा स्थितीत रेमडेसिवीरचा थोडा जरी फायदा होत असल्यास त्याचा वापर करायला हवा. रेमडेसिवीर पाच दिवसांपर्यंत दिले जाऊ शकते. परंतु रुग्ण गंभीर होत असल्यास रुग्णाचा जीव वाचविण्याकरिता संबंधित डॉक्टर सात दिवसांपर्यंत हे इंजेक्शन देऊ शकतो.