जास्तीचे पाणीदेखील आरोग्याला अपायकारक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:09 AM2021-09-23T04:09:00+5:302021-09-23T04:09:00+5:30
नागपूर : पाण्याशिवाय आपले जीवन ही कल्पना करणे शक्य नाही. पाणी कमी पिल्याने ‘डी-हायड्रेशन’चा धोका वाढत असल्याने नेहमीच अधिक ...
नागपूर : पाण्याशिवाय आपले जीवन ही कल्पना करणे शक्य नाही. पाणी कमी पिल्याने ‘डी-हायड्रेशन’चा धोका वाढत असल्याने नेहमीच अधिक प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण प्रमाणापेक्षा अधिक पाणी देखील आरोग्याला अपायकारक ठरू शकते. ‘ओव्हर -हायड्रेशन’चा त्रास जाणवू शकतो. शिवाय किडनीचा आजार असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाणी प्यायला हवे, असे युरोलॉजिस्ट तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते. आयुर्वेदात पाण्याचा उपयोग करून अनेक रोग बरे करण्याचे उपाय सांगितले आहे. परंतु अधिक प्रमाणात पाणी पिण्यात आले आणि जर ते बाहेर काढण्याचे तंत्र बंद असेल तर साठलेले पाणी रक्तातील अनेक घटक पातळ करते. त्यामुळे शरीराला हानी होण्याची भीती असते. विदर्भातील वातावरण बहुतांशवेळा उष्ण व शुष्क राहते. यामुळे सामान्य व्यक्तींनी रोज अडीच ते तीन लिटर पाणी पिणे आदर्श आहे. व्यक्तीची उंची, वजन, शारीरिक हालचाली, व्यायामाची पद्धत यावरून पाण्याच्या प्रमाणात वाढ होऊ शकते.
-पाणी कमी पिल्यास ही होऊ शकते समस्या
पाणी हे एक जीवनावश्यक आहे. शरीरात सुमारे ६० ते ७० टक्के पाणी असते. मुख्यत: लघवी आणि घाम यांच्याद्वारे दिवसभर शरीर सतत पाणी गमावत असते. व्यायामुळे किंवा उष्णतेमुळे होणाºया ‘डी-हायड्रेशन’मुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. हे रोखण्यासाठी दररोज पेय आणि अन्नामधून भरपूर पाणी मिळणे आवश्यक आहे. कमी पाणी पिल्यास बद्धकोष्ठता, मूत्रमार्ग आणि मूत्राशयातील संक्रमण, किडनी स्टोन किंवा स्किन डिहायड्रेशनसारख्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.
-कोणी किती पाणी प्यावे
युरोलॉजिस्ट डॉ. धनंजय सेलूकर यांच्यानुसार ५ वर्षांपर्यंतच्या मुलांनी साधारण एक लिटर पाणी प्यायला हवे. ५ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांनी एक ते दोन लिटर पाणी प्यायला हवे. तर,१५ ते त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांनी अडीच ते तीन लिटर पाणी प्यायला हवे. शारीरिक श्रम जास्त करीत असाल तर पाणी पिण्याचे प्रमाण वाढूही शकते.
कोट...
मूत्रपिंड सामान्य असेल आणि अधिक पाणी पिल्यास तर पोट फुगणे, मळमळ वाटणे व लघवी अधिक प्रमाणात होणे आदी त्रास होऊ शकतो. पण मूत्रपिंडाचा आजार असेल आणि अधिक पाणी पिल्यास इलेक्ट्रोलाइटचे कार्य बिघडू शकते. छातीत पाणी जमा होऊ शकते. या शिवाय, चेहऱ्यावर व पायावर सूज येऊ शकते. श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
-डॉ. धनंजय सेलूकर, विभाग प्रमुख, युरोलॉजी विभाग, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल