सर्दी, खोकल्याच्या गोळ्यांचा अति डोस वाढवतोय ताप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 10:02 PM2022-01-22T22:02:11+5:302022-01-22T22:02:38+5:30
Nagpur News गंभीर लक्षणे नसले तरी ताप व अंगदुखीची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. परिणामी, ‘पॅरासिटामोल’ या गोळ्यांची विक्रीही वाढली आहे; परंतु या औषधीच्या अत्याधिक सेवानाने मूत्रपिंड व यकृताचा धोका संभावतो.
नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संसर्गाचा फैलाव झपाट्याने होत आहे. यात गंभीर लक्षणे नसले तरी ताप व अंगदुखीची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. परिणामी, ‘पॅरासिटामोल’ या गोळ्यांची विक्रीही वाढली आहे; परंतु या औषधीच्या अत्याधिक सेवानाने मूत्रपिंड व यकृताचा धोका संभावतो.
-मार्गदर्शक तत्त्वे पाळा
पॅरासिटामोल या औषधी गोळीचा पॉवर ५०० मिली ग्रॅम तर अलीकडे ६५० मिली ग्रॅमचीही सुद्धा उपलब्ध झाली आहे. या गोळ्यांच्या वेष्टणावर ‘लिव्हर टॉक्सिसिटी’चा धोका असल्याचा इशारा ठळक अक्षरात छापले आहे. यामुळे ही औषधी स्वत:हून न घेता डॉक्टरांनी लिहून दिल्यावरच व सांगितल्यानुसारच डोस घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
-पॅरासिटामोलचा डोस असावा किती?
साधारण ताप किंवा अंगदुखीसाठी पॅरासिटामोल डायक्लोफिनेक किंवा आयब्रुफेन पॅरासिटामोल मिश्रणाचे औषध दिले जाते. यासाठी ५०० मिली ग्रॅमची अर्धी गोळी सकाळ, संध्याकाळ घेणे पुरेसे आहे. काही गोळ्या ६५० मिली ग्रॅम क्षमतेच्याही असतात. यासाठी वेष्टणावर गोळ्यांची क्षमता पाहणे आवश्यक असते.
-लहान मुलांसाठी अधिक काळजी आवश्यक
बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांच्यानुसार लहान मुलांना कोणतीही औषधी स्वत:हून देऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी द्यावीत. कारण प्रत्येक वयोगटासाठी विविध औषधांचे डोस ठरलेला असतो. शिवया, त्यांच्या लक्षणावरूनही औषधींचा डोस कमी जास्त केला जातो. यामुळे डॉक्टरांचा सल्ला आवश्यक. विशेषत: लहान मुलांसाठी तर महत्त्वाचे आहे.
- तर मूत्रपिंड व यकृताला धोका
पॅरासिटामोल गोळ्यांचे महिनाभर किंवा अधिक काळ सेवन केल्यास मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अत्याधिक सेवनामुळे यकृतालाही धोका संभावतो.
स्वत:हून औषधी घेणे टाळा
सध्या कोरोनाची लाट आहे. शिवाय, सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. यामुळे अनेक जण स्वत:हून औषधी घेतात; परंतु अशा औषधी घेणे धोकादायक ठरू शकते. ‘पॅरासिटामोलचा पहिला डोस घेतला असेल तर डॉक्टरांना तो सांगायला हवा. त्यामुळे पुढील डोस देताना त्याचा विचार होतो.
-डॉ. अविनाश गावंडे, वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ