मोबाईलच उडवतोय तुमची झोप, ‘या’ गंभीर आजारांचा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 04:15 PM2022-03-21T16:15:21+5:302022-03-21T16:21:38+5:30
मोठ्यांमध्ये कार्यालयीन कामकाजापासून ते सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी मोबाईलचा अतिरेकी वापर वाढल्याचे दिसून येत आहे. परिणामी, नातेसंबंध बिघडत चालले आहे तर, अल्पवयीन मुला-मुलींमध्ये मोबाईलचे दुष्परिणाम अधिक दिसून येत आहेत.
नागपूर : मोबाईल फोनद्वारे जे ‘इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन’ (ईएमएफआर) निघतात त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो. हे रेडिएशन लहान मुलांच्या मेंदूसाठी फारच हानिकारक ठरतात. मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे डोकेदुखी, तणाव, निद्रानाश व कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो. विशेषत: दर सेकंदाला व्हॉट्सअॅप पाहणाऱ्यांना आणि रात्र जागून वेबसिरीज पाहणाऱ्यांची झोप उडाली आहे.
कोविड आपत्तीमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे मागील पावणेदोन वर्ष ऑनलाईन शिक्षण सुरू होते. विद्यार्थ्यांचे शाळा-कॉलेज मोबाईल, टॅब व लॅपटॉपवर सुरू होते. परिणामी मुलांमध्ये ‘मोबाईल ॲडिक्शन’चे प्रमाण वाढले. आता ‘ऑफलाईन’ शाळा सुरू झाल्यातरी अनेकांच्या हातून मोबाईल सुटलेला नसल्याचे वास्तव आहे. मोठ्यांमध्ये कार्यालयीन कामकाजापासून ते सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी मोबाईलचा अतिरेकी वापर वाढल्याचे दिसून येत आहे. परिणामी, नातेसंबंध बिघडत चालले आहे तर, अल्पवयीन मुला-मुलींमध्ये मोबाईलचे दुष्परिणाम अधिक दिसून येत आहेत.
-झोपण्याच्या एक तासापूर्वी मोबाईलचा वापर नको
रात्री झोपण्याच्या आधी कमीतकमी एक तास आधी मोबाईलचा वापर करू नये. कारण मोबाईलमधून निघणाऱ्या नील किरणांमुळे आपल्या झोपेवर खूप मोठा परिणाम होतो. सकाळी उठल्यानंतर एक तासानंतर मोबाईलचा वापर करायला हवा. जेवण करत असताना मोबाईलचा वापर करू नका. रात्री झोपताना फोन डोक्याजवळ ठेवून झोपू नका, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
-एकाग्रतेचा अभाव
मोबाईलच्या अति वापरामुळे एकाग्रतेचा अभाव होतो. शारीरिक तसेच मानसिक ताण पडतो. मुले अभ्यास करताना सुद्धा मोबाईलवर गेम खेळत असतात तर काही व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामचा वापर करतात. याचा परिणाम अभ्यासावर होऊन नापासाचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
-चांगल्या झोपेसाठी हे करा
:: रोज सकाळी ठराविक वेळेवर उठा व ठराविक वेळेवरच झोपा
:: नियमित व्यायाम करा
:: दिवसा १५ मिनिटाच्या वर झोपू नका
:: बेडवर झोपून वाचणे, टीव्ही पाहणे बंद करा
:: सायंकाळी ५ वाजेनंतर चहा किंवा कॉफी घेऊ नका
:: सायंकाळी ५ वाजेनंतर धूम्रपान व मद्यपान करू नका
:: झोपण्याच्या एका तासापूर्वी टीव्ही, संगणक किंवा मोबाईलचा वापर करू नका
:: झोपण्यापूर्वी झोपेची चिंता करू नका
:: १५ मिनिटापर्यंत झोप आली नसेल तर बेडवरून उठून, दुसऱ्या खोलीत जाऊन काही वाचा.
:: रात्री झोप उघडल्यावर घड्याळ पहाणे टाळा
-मानसिक आजाराचे प्रमाण वाढले
मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे झोपेच्या पद्धतीवर नकारात्मक प्रभाव पडतो. स्मरणशक्ती आणि समस्या सोडवण्यावरही त्याचा परिणाम होतो. मोबाईलमुळे सकाळी उशिरा उठण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, लठ्ठपणा वाढला असून त्यामुळे होणारे विविध गंभीर आजार दिसून येत आहे. मानसिक आजाराचे प्रमाणही वाढत चालले आहे.
-डॉ. संजय रामटेके, मेंदूरोग तज्ज्ञ