भिवापूर तालुक्यात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:07 AM2021-07-10T04:07:30+5:302021-07-10T04:07:30+5:30
भिवापूर : मुसळधार पावसाने तालुक्यातील काही भागांना गुरुवारी दिलासा दिला असला तरी महालगाव, चिखलापार परिसरात मात्र मोठे नुकसान केले ...
भिवापूर : मुसळधार पावसाने तालुक्यातील काही भागांना गुरुवारी दिलासा दिला असला तरी महालगाव, चिखलापार परिसरात मात्र मोठे नुकसान केले आहे. संपूर्ण तालुक्यात अतिवृष्टीची नोंद प्रशासनाने केली असून, सर्वे करण्याच्या सूचनाही तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी सबंधितांना दिल्या आहेत. तालुक्यात सरासरी ८५.६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तालुक्यातील मंडळनिहाय पावसाची नोंद बघितल्यास भिवापूर १०६ मि.मी., नांद ९८ मि.मी., कारगाव ७२ मि.मी. तर मालेवाडा मंडळात ६६ मि.मी. पाऊस झाला आहे. तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेला चिखलापार व महालगाव हा परिसर दरवर्षी मुसळधार पावसाच्या तावडीत सापडतो. पूर परिस्थिती तर येथे पाचवीला पूजलेली आहे. गुरुवारी आलेल्या पावसाने येथे सळो की पळो करून सोडले. नदीनाल्यांना पूर आला. पिकांसह शेतशिवारांची अवस्था दयनीय झाली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास पूरपरिस्थिती ओसरली असली तरी शेतात मात्र तलावसदृश परिस्थिती कायम आहे. सोयाबीन, पऱ्हाटी, धानाचे पऱ्हे पाण्यात बुडून आहेत. याच भागात काही शेत कोवळ्या पिकांसह खरडून गेली आहेत, अशी वेदनादायी कैफियत महालगाव येथील शेतकरी अमित राऊत यांनी मांडली. पुराच्या पाण्यात काही दुभती जनावरे वाहून गेली होती. त्यातील बहुतांश जनावरे रात्री उशिरा घरी परतली. मात्र पुरासह नदीपात्रातील दगड, झुडपांचा मार लागल्यामुळे ती गंभीर जखमी झालेली आहेत. महत्त्वाचे म्हणजे महालगाव येथील शेतकरी सुरेश दिनबा पोहळे यांच्या वाहून गेलेल्या एका गाईचा मृतदेह शुक्रवारी सकाळच्या सुमारास नदीपात्रात आढळला. त्यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे ५० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. एकंदरीत महालगाव व चिखलापार भागात पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. वासी व मांडवा येथील नद्यांना आलेल्या पुरात पुलाचा वरचा भाग वाहून गेला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी सर्वे करण्याचे आदेश कृषी विभाग, मंडळ अधिकारी व तलाठ्यांना दिले आहे.
सहा घरांची पडझड
मुसळधार पावसामुळे तालुक्यात सहा घरांची पडझड झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे. यात भिवापूर, नांद व इंदापूर येथील प्रत्येकी दोन घरांचा समावेश आहे. इतर ठिकाणी पडझड झाल्याचे वृत्त आहे. मात्र प्रशासनाकडे अद्याप तशी अधिकृत माहिती आलेली नाही.
---------
चिखलापार व महालगाव परिसरात महिनाभराचा पाऊस दोन तासात कोसळला, असे म्हटल्यास खोटे ठरणार नाही. या पावसामुळे परिसरातील शेतांचे व उभ्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. याबाबत शेतकरी तहसीलदारांना निवेदन देणार आहोत. अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची शासनाने तातडीने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी.
- भास्कर येंगळे, शेतकरी रा. चिखलापार
-
गुरुवारी भिवापूर तालुक्यात सरासरी ८५.६० मिमी पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यात अतिवृष्टीची नोंद केली आहे. चिखलापार व महालगाव भागात नुकसान झाल्याचे वृत्त आहे. याबाबत संबंधितांना सर्वे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार भिवापूर