पांढरे केस लपविण्यासाठी ‘डाय’ करताय? केमिकल लोचा झाला तर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2022 02:12 PM2022-04-22T14:12:42+5:302022-04-22T14:21:24+5:30
हेअर डायच्या अधिक वापराने आरोग्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो.
नागपूर : प्रत्येकाच्या सौंदर्यात भर घालण्यात त्याच्या केसांचा खूप मोठा वाटा असतो. दाट, काळेभोर आणि नीटनेटके केस समोरच्या व्यक्तीवर वेगळीच छाप पाडतात. परंतु, अलीकडे मोठ्यांचेच नव्हे तर लहान मुलांचेही केस पांढरे होण्याच्या समस्येत वाढ झाली आहे.
केस पांढरे झाले की कमी वेळ आणि कमी खर्चाचा उपाय म्हणून केसांना ‘हेअर डाय’ लावण्याचे प्रमाणही वाढले आहे; पण हेअर डायच्या अधिक वापराने आरोग्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे कमी वयात केस पांढरे होणे यापेक्षाही केस काळे करण्यासाठी हेअर डाय वापरणे अनेकांना जास्त काळजी वाढविणारे ठरत आहे.
-केस अकाली पांढरे का होतात
: अनुवांशिकपणा, केसांची योग्य काळजी न घेणे, त्यांना योग्य पोषण न मिळणे
: एका अभ्यासानुसार तणाव आपल्याला वेळेआधीच वृद्धत्वाकडे घेऊन जातो.
: ‘व्हिटॅमिन बी-१२’ची कमी. याच्या कमतरतेमुळे आपल्या केसांना काळे ठेवण्याचे काम करणारे मेलानिन हे तत्त्व नवीन पेशीची निर्मिती करणे थांबवते.
:ज्या लोकांना नेहमी डोकेदुखी किंवा सायनस किंवा ॲनिमिया आजार असतो, त्या लोकांचे केसदेखील वेळेआधीच पांढरे होतात.
:मुधमेहामुळेसुद्धा केस पांढरे होण्याचा धोका असतो.
:मद्यपान, धूम्रपान, आदींचे व्यसनसुद्धा केस पांढरे होण्यास कारणीभूत ठरतात.
-डायआधी हे करून पाहा
: आवळा पावडर आणि रिठा पावडर यांचा वापर केसांसाठी परिणामकारक मानले जाते. हा उपाय करण्यासाठी एका लोखंडी कढईत आवळा पावडर व रिठा पावडर एकत्र करून रात्रभर भिजवावी. हे मिश्रण दुसऱ्या दिवशी सकाळी केसांना लावावे. हा लेप केसांवर ४५ मिनिटे ते एक तास ठेवून पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा हा उपाय करावा.
:: आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे केसांना कांद्याचा रस लावणे. केस विंचरून मग हा रस केसांच्या मुळांना लावावा. हा रस पूर्ण सुकला की मग केस शाम्पूने धुवावेत. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कांद्याचा रस लावावा. याचा चांगला प्रभाव दिसून येतो.
-डाय लावताना ही काळजी घ्या
हेअर डाय लावण्यापूर्वी त्याची ‘ॲलर्जी’ तर नाही याची तपासणी करून घ्या. यासाठी कानाच्या मागील भागात डाय लावून काही तास राहू द्या, त्यानंतर जर खाज सुटली किंवा त्वचा लालसर झाली तर तो डाय वापरू नका.
- आहाराकडे लक्ष आवश्यक
पूर्वी ४० नंतर पांढरे केस व्हायचे. अलीकडे ३० नंतर पांढऱ्या केसाच्या समस्या वाढल्या आहेत. सात ते आठ वर्षांतील मुला-मुलींमध्ये सुद्धा ही समस्या दिसून येत आहे. या मागे अनेक कारणे असले तरी महत्त्वाचे एक कारण म्हणजे आपला आहार. हा आहार योग्य नसला की त्याचा प्रभाव केसांवरही पडतो.
- डॉ. नितीन बरडे, त्वचा व केस रोग तज्ज्ञ