थर्टी फर्स्टच्याआड बनावट दारू विक्रीचा डाव नागपुरातील उत्पादन शुल्क विभागाने उधळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 10:09 PM2021-12-31T22:09:40+5:302021-12-31T22:52:07+5:30
Nagpur News सीताबर्डीतील एका फर्निचर विक्रेत्यासह दोन ठिकाणी छापा घालून शुक्रवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने १५ लाखांचा विदेशी (बनावट) मद्याचा साठा जप्त केला.
नागपूर - सीताबर्डीतील एका फर्निचर विक्रेत्यासह दोन ठिकाणी छापा घालून शुक्रवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने १५ लाखांचा विदेशी (बनावट) मद्याचा साठा जप्त केला. हा साठा बाळगणारे आरोपी सुभाष गोपाळराव वटी आणि भोजराज विठ्ठलराव रघघाटे या दोघांना अटक करण्यात आली.
मध्यप्रदेशात निर्मित विदेशी मद्याचा साठा एका फर्निचर विक्रेत्याने नागपुरात विक्रीसाठी आणल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यावरून उपायुक्त मोहन वर्दे आणि अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी लगेच दोन पथके तयार करून या मंगलम ट्रेडर्स, शनि मंदिर जवळ, सीताबर्डी या फर्निचरच्या दुकानात तसेच नवजीवन कॉलोनी, वर्धा रोड या दोन ठिकाणी शुक्रवारी रात्री छापे घातले. पथकाला येथे दारूचे मोठे घबाडच मिळाले. जॉनी वॉकर, हंडरेड पाईपर, ब्लेंडर प्राईड, रॉयल स्टॅगसह विदेशी दारूच्या वेगवेगळ्या अनेक बाटल्या दोन ठिकाणांहून पथकाने जप्त केल्या. आरोपी सुभाष वटी आणि भोजराज रघाटाटे या दोघांना ताब्यात घेतले. विभागीय आयुक्त कांतीलाल उमप, संचालक उषा वर्मा, उपायुक्त मोहन वर्दे आणि अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रवीण मोहतकर, सुभाष खरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
सूत्रधार मद्यतस्कर कोण ?
थर्टी फर्स्ट आणि न्यू ईयरच्या जल्लोषात ठिकठिकाणी ओल्या पार्टींचे आयोजन केले जाते. अर्थात दारू खरेदी विक्रीचे प्रमाण मोठे वाढत असल्याचे ध्यानात घेऊन मध्यप्रदेशातील या बनावट दारूची तस्करी करण्यात आल्याचा अंदाज आहे. मात्र, ही मद्यतस्करी तसेच विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना पकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाने तस्करांचा डाव उधळून लावला. दरम्यान, वटी आणि रघाटाटे मागचे खरे मद्यतस्कर कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बनावट मद्य विक्रेत्यांची माहिती द्या
या कारवाईमुळे नागपुरात बनावट मद्य विक्री सुरू असल्याचा संशय अधोरेखित झाला आहे. अशा प्रकारे बनावट मद्य विक्री करून मद्यपींच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आरोपींची माहिती द्या, असे आवाहन अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी केले आहे. ही माहिती ८४२२००११३३ या व्हॉटस्अप क्रमांकावर अथवा १८००८३३३३३३ या टोल फ्री क्रमांकावर देता येईल. माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नवजीवन कॉलनी, वर्धा मार्गावर ज्या घरी छापा मारला, ते घर राजू जयस्वाल नामक व्यक्तीचे असल्याची माहिती आरोपींकडून रात्री पुढे आली. त्यांनी सांगितलेल्या राजू जयस्वालच्या घरी या पथकाने पुन्हा छापा मारला. त्या घराच्या दाराला पोलिसांना कुलूप आढळले. परिणामी पथकाने पंचांसमोर ते कुलूप तोडून आत पाहणी केली असता तेथे २५ ते ३० स्कॉचच्या पेट्या (बॉक्स) आढळला. तोसुद्धा पथकाने ताब्यात घेतला.