प्रशासनात खळबळ : केंद्रीय पथक आले, नागपूर मनपाला थांगपत्ता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:32 AM2019-01-23T00:32:00+5:302019-01-23T00:33:07+5:30
स्वच्छ शहरांच्या यादीत २०१९ या वर्षात नागपूर कोणत्या क्रमांकावर असेल याची उत्सुकता लागली आहे. याची पार्श्वभूमी पुढील सहा दिवसात ठरण्याची शक्यता आहे. स्वच्छता सर्वेक्षण-२०१९ साठी केंद्रीय पथक नागपुरात पोहचले आहे. प्रशासनाला माहिती न देता पथक शहरातील विविध भागाचा दौरा करून स्वच्छतेची माहिती घेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दक्षिण व पश्चिम नागपुरातील काही भागाची पथकाने पाहणी केली. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंगळवारी दुपारपर्यंत याची माहिती नव्हती. सायंकाळच्या सुमारास महापालिका सूत्रांनी पथक नागपुरात पोहोचल्याला दुजोरा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छ शहरांच्या यादीत २०१९ या वर्षात नागपूर कोणत्या क्रमांकावर असेल याची उत्सुकता लागली आहे. याची पार्श्वभूमी पुढील सहा दिवसात ठरण्याची शक्यता आहे. स्वच्छता सर्वेक्षण-२०१९ साठी केंद्रीय पथक नागपुरात पोहचले आहे. प्रशासनाला माहिती न देता पथक शहरातील विविध भागाचा दौरा करून स्वच्छतेची माहिती घेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दक्षिण व पश्चिम नागपुरातील काही भागाची पथकाने पाहणी केली. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंगळवारी दुपारपर्यंत याची माहिती नव्हती. सायंकाळच्या सुमारास महापालिका सूत्रांनी पथक नागपुरात पोहोचल्याला दुजोरा दिला.
पथक आल्याची माहिती मिळताच महापालिका प्रशासन सक्रिय झाले. सायंकाळी उशिरा वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यात आरोग्य निरीक्षक, झोनचे सहायक आयुक्तासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले होते. स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला.
केंद्रीय पथकात किती जणांचा समावेश आहे, कोण कोण आहेत. तसेच कोणत्या भागांची पाहणी केली याची कोणत्याही प्रकारची माहिती महापालिका प्रशासनाकडे नाही. सूत्रांच्या माहितीनुसार या पथकात पाच जणांचा समावेश आहे. त्यांनी दक्षिण व पश्चिम नागपुरातील हनुमाननगर, नेहरूनगर व धरमपेठ भागातील अनेक ठिकाणांची पाहणी केली. बाजार भागाचीही माहिती घेतली. आठवडाभर पथक नागपुरात वास्तव्यास आहे. परंतु पथकाचा मुक्काम नेमका कुठे आहे याची माहिती देण्यात आलेली नाही. केंद्रीय पथक कचरा संकलन, वाहून नेणे, प्रक्रिया व स्वच्छतेबाबतच्या अन्य बाबींची माहिती जाणून घेणार आहे. पथकाच्या दौऱ्याचा कार्यक्रम गोपनीय ठेवण्यात आला आहे. नवी दिल्लीहून त्यांना ऑनलाईन लोकेशन दिले जात आहे. गुगल मॅपनुसार पथक त्या ठिकाणी पोहचते व स्वच्छतेची पाहणी क रते. कार्वी कंपनीला गृह व नागरी विभागाने सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविली आहे. पथक दोन चमूत पाहणी करून माहिती संकलित करीत आहेत.
स्वच्छता सर्वेक्षणाची महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. कचरा संकलन केंद्रांचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. तसेच प्रक्रिया करण्यासाठी प्रभावी पयत्न करण्यात आले आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या क्रमवारीत सुधारणा होणार असल्याचा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.
दस्तावेज तपासणार नाही
गेल्या वर्षी केंद्रीय पथकाने पहिल्या दिवशी महापालिका मुख्यालयात दस्तऐवजांची तपासणी केली होती. यावेळी दस्तऐवज तपासण्यात येणार नाही. १६८ नमुन्यात माहपालिकेकडून विविध स्वरुपाची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने केंद्र सरकारला ऑनलाईन पाठविली आहे. त्यानुसार केंद्रीय पथक स्थळे निश्चित करून पाहणी करीत आहे. पथक १०० हून अधिक नागरिकांशी चर्चा करणार आहे. त्याचा फिडबॅक ऑनलाईन नोंदविला जाणार आहे.
पथकाच्या दौऱ्याची माहिती नाही
केंद्रीय पथकाच्या दौऱ्याबाबत महापालिका प्रशासनाला कोणत्याही स्वरुपाची माहिती नसल्याचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार पथक नगपुरात स्वत:च्या स्तरावर दौरा करीत आहे. पथकातील सदस्य कोणत्या भागाचा दौरा करणार, त्यांचा मुक्काम कोठे आहे याची कोणत्याही प्रकारची माहिती नाही. केंद्रीय पथक स्वत: स्वच्छतेची पाहणी करून आकलन करणार आहेत. यावेळी चांगले प्रयत्न करण्यात आले आहे. क्रमवारीत निश्चित सुधारणा होईल.
रवींद्र ठाकरे, अपर आयुक्त महापालिका