मतदारांमध्ये उत्साह, सकाळी-सायंकाळी रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:13 AM2021-01-16T04:13:21+5:302021-01-16T04:13:21+5:30
उमरेड : कुडकुडणाऱ्या थंडीसोबत हळुवार सूर्यकिरणांची चाहूल लागताच सकाळी ७.३० वाजतापासून शुक्रवारी तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची लगबग सुरू झाली. ...
उमरेड : कुडकुडणाऱ्या थंडीसोबत हळुवार सूर्यकिरणांची चाहूल लागताच सकाळी ७.३० वाजतापासून शुक्रवारी तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची लगबग सुरू झाली. काही वेळानंतर सकाळी ११ वाजेपर्यंत रांगा तर दुपारी दोन तास मतदान केंद्रावरील गर्दी कमी झाली. दुपारी २ वाजेपासून हळुहळु गर्दी वाढू लागली. तालुक्यात सकाळी ७.३० ते १.३० वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी ३.३० वाजता मतदानाची टक्केवारी ७२.२७ टक्के पोहोचली. सायंकाळी यात आणखी भर पडली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत १२ हजार ८३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ६४२४ पुरुष तर ६४०८ महिला मतदारांचा समावेश होता. तालुक्यात नवेगाव साधू, चनोडा, किन्हाळा, शेडेश्वर, सावंगी खुर्द, बोरगाव लांबट, कळमणा बेला, खुर्सापार बेला, खैरी बुटी, शिरपूर, खुर्सापार उमरेड, विरली, मटकाझरी या ग्रामपंचायतींमध्ये कुठेही अनुचित प्रकार बघावयास मिळाला नाही. ४३ वॉर्डातील ११६ जागांसाठी ४१ मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. बहुतांश मतदार तोंडावर मास्क वा रुमाल लावूनच मतदान केंद्रावर प्रवेश करीत होते. ४१ मतदान केंद्रावर २८७ कर्मचाऱ्यांचा ताफा निवडणूक प्रक्रियेत सक्रिय होता. कुठेही यंत्रबिघाडाची तक्रार नसल्याची बाब नायब तहसीलदार टी. डी. लांजेवार यांनी सांगितली. २५९ उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात सीलबंद करण्यात आले.
महिलांमध्ये उत्साह
उमरेड तालुक्यात एकूण १७,७५५ मतदारांपैकी ९,४०० पुरुष तर ८,३५५ मतदार महिला आहेत. महिला मतदारांचे प्रमाण थोडे कमी असले तरी मतदानासाठी महिलांमध्ये अधिक उत्साह दिसून येत होता. दुपारी ३.३० वाजेपर्यंत महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी ७६.७० (६,४०८) टक्के होती.