हत्तीने उडविली रेल्वेस्थानकावर खळबळ, सुरक्षा यंत्रणांची धावपळ, तासभर रोखला गेला अनेकांचा श्वास
By नरेश डोंगरे | Published: August 13, 2022 10:36 PM2022-08-13T22:36:44+5:302022-08-13T22:37:31+5:30
Railway Station: घातपाताच्या शंकेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकावर चोख बंदोबस्त असताना मध्यप्रदेशातून आलेल्या हत्तींनी सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडवून दिली. शंकाकुशंका निर्माण झाल्याने अनेकांची धाकधूक वाढली.
- नरेश डोंगरे
नागपूर - घातपाताच्या शंकेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकावर चोख बंदोबस्त असताना मध्यप्रदेशातून आलेल्या हत्तींनी सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडवून दिली. शंकाकुशंका निर्माण झाल्याने अनेकांची धाकधूक वाढली. त्यामुळे बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या श्वानाने तब्बल तास-दोन तास कसून तपासणी केली. त्यानंतर ‘नो प्रॉब्लेम’चा निष्कर्ष काढण्यात आला अन् सुरक्षा यंत्रणेसह रेल्वचे प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत असतानाच स्वातंत्र्य दिन अवघ्या काही तासांवर आला आहे. त्यामुळे सर्वत्र चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. उपराजधानीतील गर्दीच्या सर्व ठिकाणी आणि खास करून महत्वांच्या स्थळांसह रेल्वेस्थानक, बसस्थानकावरही कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. संशयीत व्यक्ती आणि वस्तूंवर पोलीस नजर रोखत आहेत. या पार्श्वभूमीवर, शनिवारी सायंकाळी ५.४५ ला रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक २-३ वर एका व्यक्तीकडे असलेल्या पार्सलवर पोलिसांची नजर गेली. त्यांनी मेटल डिटेक्टरने तपासणी केली असता त्यातून वेगळाच आवाज आला. त्यामुळे पोलीस सतर्क झाले. लगेच बीडीडीएसचे पथक बोलवून घेण्यात आले. श्वानानेही डब्यात काही तरी वेगळे आहे, असे संकेत दिले. त्यामुळे तपास यंत्रणांसह रेल्वे प्रशासनातही खळबळ निर्माण झाले.
एकूण १५ डबे (पार्सल) होते आणि पंधराही डब्यातून टिक्... टिक्... असा आवाज येत असल्याने अनेकांच्या मनात धाकधूक निर्माण झाली होती. दरम्यान् , ही माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलीस, आरपीएफचेही वरिष्ठ फलाटावर पोहचले. सुरक्षेचे एक रिंगण तयार करण्यात आले. १५ ही डबे क्रमशा उघडण्यात आले. प्रत्येक डब्यात मेटलचा एक फुटाचा एक हत्ती होता. तास दोन तास कसून तपासणी केल्यानंतर ‘या हत्तीकडून कसलाही धोका नसल्याचा निर्वाळा बीडीडीएसने दिला. त्यानंतर रेल्वे प्रशासन, लोहमार्ग पोलीस, आरपीएफसह सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
बैतूलहून आले, मुंबईकडे गेले
सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडवून देणारे ‘ते’ हत्ती मध्यप्रदेशातील बैतूल येथे तयार करण्यात आले होते. दक्षीण एक्सप्रेसने नागपूर स्थानकावर दुपारी पोहचले. रात्री ते दुरांतोने मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र, मध्येच तपासणी झाल्याने पार्सल फोडून हत्ती बाहेर काढण्यात आले अन् सर्व गोंधळ निर्माण झाला. अखेर रात्री दुरांतो एक्सप्रेसने ते मुंबईकडे रवाना झाले.