नागपूर जिल्हा न्यायालयात धामण सापाने माजवली खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 08:45 PM2019-07-08T20:45:49+5:302019-07-08T20:46:43+5:30
जिल्हा व सत्र न्यायालय नेहमीच कोणत्याना कोणत्या घटनेमुळे चर्चेत असते. सोमवारी दुपारी धामण जातीच्या सापाने या न्यायालयात खळबळ माजवली. सर्पमित्राने त्या सापाला पकडून बाटलीबंद केल्यानंतर सर्वांनी सुटेचा नि:श्वास सोडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा व सत्र न्यायालय नेहमीच कोणत्याना कोणत्या घटनेमुळे चर्चेत असते. सोमवारी दुपारी धामण जातीच्या सापाने या न्यायालयात खळबळ माजवली. सर्पमित्राने त्या सापाला पकडून बाटलीबंद केल्यानंतर सर्वांनी सुटेचा नि:श्वास सोडला.
अॅड. वासुदेव कापसे, अॅड. संदीप साखरे, अॅड. प्रेरणा पानतावणे आदी वकील न्यायालयातून बाहेर पडण्याच्या द्वारावर चहा पित उभे होते. दरम्यान, धामण जातीचा साप झाडावरून खाली पडला. तो साप न्यायालय परिसरात आला व अॅड. अमोल जलतारे यांच्या कारमध्ये शिरला. त्यामुळे वकिलांनी तातडीने सर्पमित्र रितीक माहुते यांना फोन करून न्यायालयात बोलावून घेतले. माहुते यांनी लगेच न्यायालयात पोहचून सापाला कारमधून बाहेर काढले व बाटलीत बंद केले. त्यानंतर सापाला निर्जनस्थळी सोडून देण्यात आले. त्या सापाला पकडेपर्यंत कुणाच्याच जीवात जीव नव्हता. सापाला पाहण्यासाठी गर्दी जमली होती.