गोकुळाष्टमीनिमित्त उपराजधानीतील बाजारात उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:15 AM2019-08-23T11:15:50+5:302019-08-23T11:16:38+5:30
गोकुळाष्टमी सण पारंपरिकरीत्या यावर्षी शनिवारी आणि रविवारी साजरा करण्यात येणार आहे. उत्सवानिमित्त बाजारात उत्साह आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्णाच्या जन्मसोहळ्याचा उत्सव. गोकुळाष्टमी सण पारंपरिकरीत्या यावर्षी शनिवारी आणि रविवारी साजरा करण्यात येणार आहे. उत्सवानिमित्त बाजारात उत्साह आहे. मूर्तिकारांपासून ते सजावटीच्या वस्तू विक्रेत्यांमध्ये आनंद आहे. महागाईनंतरही भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मूर्तिकार विनोद सूर्यवंशी यांनी सांगितले की, यावर्षी रंग, माती आणि वाहतुकीचे दर वाढल्यामुळे मूर्तींच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. मूर्ती आकारानुसार ५०० ते ५ हजारांपर्यंत आहेत. नागपुरात अनेकांच्या घरी परंपरेनुसार हा सण दोन, तीन आणि पाच दिवस साजरा करण्यात येतो. लोक मूर्तिकारांकडे मातीच्या मूर्तीसाठी पूर्वीच नोंदणी करतात. शनिवारी सायंकाळी श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना होणार असल्यामुळे लोकांची लगबग वाढली आहे. प्रदूषण वाढविणाऱ्या पीओपी मूर्तीची विक्री प्रशासनाने बंद करावी, असे सूर्यवंशी म्हणाले.
सजावटीच्या वस्तूंचे विक्रेते श्रीधर शास्त्रकार म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही मूर्तीच्या सजावटीच्या वैविध्यपूर्ण वस्तू बाजारात आल्या आहेत. शिवाय दरही वाढले आहेत. १० रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत किंमत आहे. सण साजरा करणारा सामान्य माणूस जुन्याच वस्तूने सजावट करीत असल्यामुळे तो नवीन वस्तू फार कमी खरेदी करतो. यावर्षी बाजारात चीनच्या वस्तूंची रेलचेल आहे. या वस्तू स्वस्त आणि दिसायला सुंदर आहेत.
महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे म्हणाले, तुलनात्मकरीत्या यावर्षी पूजेच्या फुलांच्या किमतीत २० टक्के वाढ झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक येथील फुले मुंबई आणि नागपुरात विक्रीसाठी जातात. पण या ठिकाणी यावर्षी मुसळधार पाऊस आणि पुरामुळे फुलांच्या उत्पादनांवर परिणाम झाला आहे. याशिवाय विदर्भात पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे लागवडही उशिरा झाली. त्यामुळे उत्पादन गणेशोत्सवानंतर येण्याची अपेक्षा आहे. बाजारात अन्य जिल्ह्यातून आणि काही स्थानिक उत्पादकांकडून कमी आवक आहे. लाल व पिवळ्या झेंडूची फुले ८० ते १२० रुपये किलो, हैदराबादी लाल गुलाब १५० ते २०० रुपये किलो, निशिगंधा २०० ते ३०० रुपये, जाईजुई ५०० ते ७०० रुपये किलो आहे. पूजेसाठी या फुलांना जास्त मागणी आहे.
रणनवरे म्हणाले, समारंभात कृत्रिम फुलांची सजावट करण्यात येत असल्यामुळे कट फ्लॉवरची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे कारागीर बेकार झाले आहेत. शासनाने यावर प्रतिबंध आणावा. असोसिएशनने याची तक्रार प्रदूषण मंडळाकडे केली आहे.