भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचा उत्साह, पावसाची चिंता अन् तिकिटांसाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 11:59 AM2022-09-22T11:59:24+5:302022-09-22T12:06:56+5:30
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरेल? : तीन वर्षानंतर होतोय सामना
नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघादरम्यान तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरी लढत शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा स्टेडियमवर खेळली जाणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने तब्बल तीन वर्षांनंतर नागपुरात आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे.
जामठा मैदानावर आतापर्यंत १२ पुरुषांचे व महिलांचे दोन टी-२० सामने खेळले गेले आहेत. नागपुरात शेवटचा भारत टी-२० सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात नोव्हेंबर २०१९ मध्ये खेळला गेला होता. दीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय सामना होणार असल्याने नागपूरकर क्रिकेटप्रेमींसाठी एकप्रकारे मेजवानी राहणार आहे. क्रिकेट सामन्याचा उत्साह शिगेला पोहोचला असून, सामना पाहण्यासाठी नागपूर विदर्भासह नजीकच्या छत्तीसगड तसेच मध्य प्रदेशातून क्रिकेट चाहते हजेरी लावणार आहेत. ४५ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या जामठा स्टेडियमची सर्व तिकिटे अवघ्या काही मिनिटांत संपल्याने अनेकांची घोर निराशा झाली. लढतीवर मात्र पावसाचे सावट आहे.
सामन्याच्या दिवशी पाऊस..
हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी सामन्याच्या दिवशी सकाळी वादळी पावसाची शक्यता आहे. सामना सायंकाळी ७ वाजेपासून असल्याने त्यावेळी पाऊस हजेरी लावेल का, हे हमखास सांगता येणार नाही. आकाश मात्र दिवसभर आणि सायंकाळी ढगाळ असेल. दरम्यान मंगळवारी रात्रभर पावसाने दमदार हजेरी लावताच बुधवारी जामठा मैदानाशेजारच्या पार्किंगच्या जागेवर चिखल झाला होता. सभोवताल शेताची जमीन असल्याने चारचाकी आणि दुचाकी वाहने चिखलात फसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तिकिटे 'सोल्ड आउट'
- सामन्याची तिकिटे काही मिनिटांतच संपल्यामुळे सोशल मीडियावर 'ब्लॅक'मध्ये विक्रीची जोरात चर्चा सुरु झाली. रविवारी ऑनलाइन तिकिटे पहिल्या दहा मिनिटात संपल्याने आता काळ्याबाजारातून 'तिकिटांचे 'मॅनेजमेंट' होते का, अशीही विचारणा होत आहे. शहरात अनेक ठिकाणी कानोसा घेतला तेव्हा ब्लॅकमध्ये विक्री करणाऱ्यांकडे सर्व प्रकारची तिकिटे उपलब्ध असून, अव्वाच्या सव्वा दर वसूल करण्यात येत आहे.
- ६५० रुपयांच्या तिकिटांपासून तर महागडे तिकीटही या ब्लॅकमध्ये विक्री करणाऱ्यांकडे उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असल्याने पोलिसांनी याची चौकशी करावी, अशी मागणी क्रिकेट शौकिनांती केली. तिकिटे न मिळाल्याने दिवसभर अनेकांनी सोशल माध्यमांवर दिवसभर संताप मांडत खदखद व्यक्त केली. तिकीट विक्रीची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार; ५०० चे तिकीट २५०० तर २००० चे ५ हजारांना
काही जुगाड आहे का?
क्रिकेटप्रेमी नागपुरात राहणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांना फोन करून तिकिटांचा जुगाड आहे का? अशी विचारणा करू लागले आहेत. प्रयत्न करूनदेखील तिकीट न मिळाल्याने बहुतांश जणांचा भ्रमनिराश झाला. काहींना एक तर काहींना दोन तिकीट उपलब्ध झाली खरी; मात्र कुटुंबातील प्रत्येकाला सामना पाहण्याची इच्छा असल्याने अनेकांनी चढ्या दराने जवळची तिकिटे विकून टाकली.
जामठ्यात भारताचेच वर्चस्व
जामठा स्टेडियमवर याआधी भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात एक कसोटी आणि चार एकदिवसीय सामने खेळले गेले. सर्व पाचही सामन्यांत भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. टी-२०त अव्वल असलेला भारतीय संघ आपल्या वि विक्रमात आणखी एका विजयाची भर घालण्यास इच्छुक असेल. दुसरीकडे या प्रकारातील विश्वविजेता ऑस्ट्रेलियादेखील जामठा मैदानावर विजयाचे खाते उघडण्यासाठी प्रयत्न करेल.