खळबळजनक! कारागृहातील कैद्याच्या अंतर्वस्त्रातून मोबाईल, बॅटरी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2023 10:26 PM2023-01-07T22:26:54+5:302023-01-07T22:27:31+5:30
Nagpur News कोटा येथून न्यायालयीन सुनावणीहून परत आणलेल्या कैद्याने अंतर्वस्त्रांमध्ये मोबाईल व दोन बॅटऱ्या लपविल्या होत्या. तपासणीदरम्यान त्याची चलाखी उघड झाली. या घटनेमुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
नागपूर : कैद्यांकडे मोबाईल, ड्रग्ज सापडल्याने नागपूर मध्यवर्ती कारागृह मागील वर्षी चर्चेत होते. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात कारागृहात परत एकदा कैद्याकडे मोबाईल व बॅटरी सापडल्या आहेत. कोटा येथून न्यायालयीन सुनावणीहून परत आणलेल्या कैद्याने अंतर्वस्त्रांमध्ये मोबाईल व दोन बॅटऱ्या लपविल्या होत्या. तपासणीदरम्यान त्याची चलाखी उघड झाली. या घटनेमुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
मालेगाव येथील दरोडा प्रकरणात संबंधित कैद्याला सात वर्षांची शिक्षा झाली असून ती लवकरच संपणार आहे. मात्र त्याच्यावर राज्याबाहेरदेखील गुन्हे दाखल आहे. एका प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीसाठी कारागृह पोलिसांचे पथक त्याला राजस्थान येथील कोटा न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन गेले. शनिवारी पहाटे ५.२० वाजता पथक परत नागपूर कारागृहात पोहोचले. नियमांनुसार आत प्रवेशाअगोदर कैद्याची सखोल झडती घेतली जाते. या कैद्याची झडती घेताना सुरक्षारक्षकाला संशय आला. त्याच्या अंतर्वस्त्रात मोबाईल आढळून आला. या प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.
या घटनेला कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी दुजोरा दिला. कैद्याला न्यायालयातून आणल्यानंतर त्याची झडती घेतली असता मोबाईल व बॅटरी सापडली. या संदर्भात कारागृह प्रशासनाच्या वतीने धंतोली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.