खळबळजनक! पश्चिम आफ्रिकेतून नागपुरात आलेल्या प्रवाशाला कोरोनाचा संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 06:30 AM2021-12-08T06:30:00+5:302021-12-08T06:30:02+5:30
पश्चिम आफिक्रेतून रविवारी नागपुरात आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.
नागपूर : पश्चिम आफिक्रेतून रविवारी नागपुरात आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय इंग्लंड प्रवासाचा इतिहास असलेल्या मायलेकीलाही कोरोनाची बाधा झाली असून, त्यांनाही ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले आहे. या तिघांचेही नमुने जनुकीय तपासणीसाठी (जिनोम सिक्वेंसिंग) पाठविण्यात आले आहेत.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा राज्यातही शिरकाव झाला आहे. सोमवारपर्यंत १० रुग्ण आढळून आले आहेत. परंतु, नागपूर जिल्ह्यात या विषाणूचा अद्यापतरी एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मागील दहा दिवसांत विदेशातून १७५ प्रवासी आले. यातील १४५ प्रवाशांचा शोध लागला असून, त्यांचे नमुने निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. उर्वरित ३० प्रवाशांचा शोध घेण्यासाठी महानगरपालिकेने पोलिसांकडे जबाबदारी सोपवली आहे. रविवारी पॉझिटिव्ह आलेल्या ३९ वर्षीय महिला आणि त्यांची ६ वर्षीय मुलगी ३० नोव्हेंबर रोजी नागपुरात आल्या. ५ डिसेंबर रोजी या मायलेकीने तपासणी केली असता दोघींनाही कोरोना असल्याचे निदान झाले. त्यांनी याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाला दिल्यानंतर ‘एम्स’मध्ये दोघींना भरती करण्यात आले.
- त्या रुग्णासाठी स्वतंत्र कक्ष
पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो या शहरातून ४० वर्षीय पुरुष ५ डिसेंबर रोजी नागपूरच्या विमानतळावर आला असता त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. अहवाल पॉझिटिव्ह येताच मनपाच्या आरोग्य विभागाने ‘एम्स’मध्ये दाखल केले. आफ्रिकेतील प्रवाशाचा इतिहास असल्याने रुग्णाला स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे, तर मायलेकींना दुसऱ्या कक्षात ठेवण्यात आले आहे. तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
- हायरिस्क देशातून अद्याप एकही प्रवासी नाही
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर युरोपातील काही देश व युनायटेड किंगडमसह (युके) दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बॉट्स्वाना, चीन, मॉरिशिअस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग व इस्राईल हे हायरिस्क देश म्हणून घोषित करण्यात आले आहेत. नागपुरात अद्याप या देशातून एकही प्रवासी आला नसल्याचे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी सांगितले.
-तिन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर
विदेशातून आलेल्या तिन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. सात दिवसांनंतर पुन्हा त्यांची तपासणी केली जाईल. मायलेकींना वेगळ्या कक्षात, तर पश्चिम आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशाला स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. तिघांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. नागपूर ‘एम्स’मध्ये लवकरच ‘जिनोम सिक्वेंसिंग’ सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
-डॉ. विभा दत्ता, मेजर जनरल, संचालक एम्स, नागपूर