नागपूर ‘टेन के’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: October 24, 2015 03:15 AM2015-10-24T03:15:10+5:302015-10-24T03:15:10+5:30
प्रो-हेल्थ फाऊंडेशनच्यावतीने आणि लोकमतच्या सहकार्याने रविवार २५ आॅक्टोबर रोजी आयोजित ‘नागपूर १० के’ दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
रविवारी दौड : तीन हजार धावपटूंचा सहभाग
नागपूर : प्रो-हेल्थ फाऊंडेशनच्यावतीने आणि लोकमतच्या सहकार्याने रविवार २५ आॅक्टोबर रोजी आयोजित ‘नागपूर १० के’ दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांवर १ लाख ६० हजारांच्या रोख रकमेसह विविध भेटवस्तूंच्या स्वरूपात बक्षिसांची लयलूट होणार आहे.
संस्थेचे प्रमुख डॉ. अमित समर्थ यांनी सांगितले की, पहिले वर्ष असताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला याचा आनंद वाटतो. याच कारणास्तव सहभागी होणाऱ्यांसाठी प्रवेश तिथी २४ आॅक्टोंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दौडीत तीन हजार धावपटूंनी प्रवेश निश्चित केला असून त्यात तीन किमी दौडीत १५००, पाच किमी दौडीत एक हजार आणि दहा किमी दौडीत ५०० वर खेळाडू सहभागी झाले आहेत.
आज शनिवार २४ आॅक्टोबर रोजी अमरावती मार्गावरील भास्कर भवन येथे धावपटूंना टी शर्ट वितरण करण्यात येईल. सोबतच प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंची नावे नोंदविण्यात येतील. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज मैदानावरून दौडीला प्रारंभ होईल. दौडीची सांगता याच ठिकाणी होणार आहे. तीन, पाच आणि दहा किमी अंतराच्या दौडीतील विजेत्यांना एकूण १ लाख ६० हजाराचे रोख पुरस्कार दिले जातील. याशिवाय प्रत्येक गटातील पहिल्या पाच विजेत्यांना लोटो शूज देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी धावपटूंना आयोजकांकडून टी शर्ट, बॅग आणि रिफ्रेशमेंट देण्यात येणार आहे. दौड पूर्ण करणाऱ्या सर्वांना मेडल्स तसेच प्रमाणपत्र दिले जाईल. दहा किमी दौडीत विजेत्या धावपटूला दहा हजार, दुसऱ्या स्थानावरील स्पर्धकास पाच हजार, तिसऱ्या स्थानासाठी तीन हजार, चौथ्या स्थानासाठी दोन हजार आणि पाचव्या स्थानासाठी एक हजाराचे बक्षीस राहील.
दौडमध्ये सहभागी होण्यासाठी हॉलमार्क (लॉ कॉलेज चौक), एनसायक्लोपीडिया (त्रिमूर्ती नगर), वेव्ह (श्रीराम टॉवर्स), वर्धमान इलेक्ट्रॉनिक्स (वर्धमान नगर), लोटो शॉपी(मुंजे चौक), तसेच प्रो हेल्थ फाऊंडेशनच्या नासुप्र स्केटिंग रिंक डागा ले आऊट येथील कार्यालयात संपर्क करता येईल. (क्रीडा प्रतिनिधी)