बेशिस्त वाहनचालकांना चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:10 AM2017-10-30T00:10:40+5:302017-10-30T00:12:20+5:30
वाहतूक शाखेच्या चेंबर तीनच्या पथकाने नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाºयांवर धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहतूक शाखेच्या चेंबर तीनच्या पथकाने नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाºयांवर धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. अवघ्या सहा महिन्यांत पाचपैकी चेंबरच्या तीन पथकाने पाच कोटी, एक लाख रुपयांचे तडजोड शुल्क वसूल केले आहे.
गेल्या काही महिन्यांत वाहतूक शाखेच्या पोलिसांसोबत वाद घालणे, मारहाण करणे आणि त्यांच्या अंगावर वाहने घालण्याचाही प्रकार वाढला आहे. या गैरप्रकारामागची पार्श्वभूमी लक्षात घेता वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांनी कडक मात्र कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश सर्व वाहतूक शाखेच्या अधिकारी-कर्मचाºयांना दिले. शहरातील वाहतूक शाखेच्या चेंबर तीनचे प्रमुख वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक बागुल यांनी प्रारंभी आपल्याच अधिनस्थ अधिकारी-कर्मचाºयांना तणावमुक्त करण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यानसाधना आदी शिबिराचे आयोजन करून त्यांना शिस्त लावली. त्यानंतर शाळा, महाविद्यालये, मॉल, बाजारपेठा तसेच शहरातील गर्दीच्या ठिकाणी सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने वाहनचालकांसाठी जनजागरणाचे विविध उपक्रम राबविले. त्यांना वाहतूकीच्या नियमांची माहिती दिली. त्यानंतर बागुल यांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची धडक मोहीम सुरू केली. धोकादायक पद्धतीने, वेगात वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, ट्रीपल सिट दुचाकी चालविणे, चुकीच्या बाजूने (राँग साईड) वाहने चालविणे, मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहने चालविणे यांच्याविरुद्ध कारवाईची धडक मोहीम राबविणे सुरू केल्याने वाहतूक शाखेला सहा महिन्यांत पाच कोटी, एक लाख रुपयांचा महसूल दंडापोटी मिळाला. अवघ्या तीन महिन्यात विविध वाहनचालकांचे ३७ हजार २९७ हार्ड चलान बनविण्यात आले. तर, ५३ हजार ९१४ बेशिस्त वाहनचालकांना ई-चालान पाठविण्यात आले.
कारवाई अन् समुपदेशनही
पोलीस निरीक्षक बागुल यांच्या माहितीनुसार, २५ ते २८ आॅक्टोबर या तीन दिवसांत विशेष अभियान राबविण्यात आले. या अभियानात आॅटोचालकांना बैठक व्यवस्था नीट करणे, गणवेश घालून वाहन चालविणे, मर्यादित वेगातच वाहन चालविणे, मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी न घेणे, अवैध प्रवासी वाहतूक न करणे आदींबाबत सूचना, समुपदेशन करण्यात आले. त्याला न जुमानणाºया १७१४ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यात ५६२ आॅटोचालकांचाही समावेश आहे. या कारवाई दरम्यान २६० वाहने ताब्यात घेण्यात आली. विशेष म्हणजे, बेशिस्त आॅटोचालकांना वठणीवर आणण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेतून मोठ्या प्रमाणात ई-चालान पाठवून ३१ लाख, ६८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस निरीक्षक वाय. एम. सोलसे, सहायक निरीक्षक धनराज निळे, पोलीस उपनिरीक्षक आखरे, सावरकर, पवार, राठोड आणि केदारे तसेच त्यांच्या सहकाºयांचाही या मोहिमेत विशेष सहभाग असल्याचे या पथकाचे प्रमुख अशोक बागुल यांनी सांगितले. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहील, असे बागुल यांनी लोकमतला सांगितले.