हत्तीरोग निर्मूलन मोहिमेतून नागपूरला वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:10 AM2021-07-07T04:10:40+5:302021-07-07T04:10:40+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : हत्तीरोगावर (लिम्फॅटिक फायलेरिया) नियंत्रण मिळविण्यासाठी जानेवारी २०१९ मध्ये नागपूरसह १८ जिल्ह्यांमध्ये हत्तीरोग सामुदायिक उपचार मोहीम ...

Excluded Nagpur from elephantiasis eradication campaign | हत्तीरोग निर्मूलन मोहिमेतून नागपूरला वगळले

हत्तीरोग निर्मूलन मोहिमेतून नागपूरला वगळले

Next

सुमेध वाघमारे

नागपूर : हत्तीरोगावर (लिम्फॅटिक फायलेरिया) नियंत्रण मिळविण्यासाठी जानेवारी २०१९ मध्ये नागपूरसह १८ जिल्ह्यांमध्ये हत्तीरोग सामुदायिक उपचार मोहीम हाती घेण्यात आली. यात आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्यासमक्ष नागरिकांना ‘ट्रिपल ड्रग’ औषधी खाऊ घालण्याची अट होती. गैरसमजापोटी मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळाला. यातच मार्च २०२० पासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्याने पुढे ही मोहीमच बंद पडली. आता पुन्हा हत्तीरोग निर्मूलनाची मोहीम राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये राबविली जात आहे. यात विदर्भातील पाच जिल्हे आहेत. मात्र, नागपूर जिल्ह्याला वगळण्यात आल्याने येथील हत्तीरोग नियंत्रणात आला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आरोग्य व कुटुंबकल्याण विभागानुसार देशात हत्तीरोगाने ग्रस्त असलेले २५६ जिल्हे आहेत. यात महाराष्ट्रातील १८ जिल्हे हत्तीरोगाने संसर्गित आहेत. २०२०-२१ पर्यंत हत्तीरोगाच्या ३१ हजार २५८ व हायड्रोसीलच्या ११ हजार ९२९ प्रकरणांची नोंद झाली आहे. २०१७ च्या आकडेवारीनुसार, नागपूर जिल्ह्यात ४,७५८ व्यक्तींना अवयव सुजण्याचा, तर २,८७७ व्यक्तींना गुप्तांगांना सूज येण्याचा त्रास होता. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी पूर्वी ‘डायथिल कार्बामाझिन सायट्रेट’ व ‘अलबेंडाझॉल’ औषध दिले जायचे. परंतु हत्तीपाय दुरीकरण मोहिमेत ‘आयव्हरमेक्टिन’ या औषधाचाही समावेश करण्यात आला.

या ‘ट्रिपल ड्रग’ मोहिमेचा शुभारंभ नागपूर जिल्ह्यासह राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये झाला. नागपूर जिल्ह्यात ३१ जानेवारी २०१९ पर्यंत हत्तीरोगाचे ‘ट्रिपल ड्रग’ देण्याचे लक्ष्य होते. परंतु मोहिमेला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला. परिणामी, मार्च २०२० पर्यंत मोहिमेला मुदतवाढ देण्यात आली. याचदरम्यान कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्याने व या मोहिमेतील मनुष्यबळ कोरोनाच्या कामासाठी वापरण्यात आल्याने ही मोहीम थंडबस्त्यात पडली.

- गडचिरोली, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात तिहेरी औषधोपचार योजना

मागील आठवड्यात या आजारावरील झालेल्या कार्यशाळेत आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय ‘एनव्हीबीडीसीपी’चे अतिरिक्त संचालक डॉ. नुपूर रॉय यांनी सांगितले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा हत्तीरोग निर्मूलनाची मोहीम हाती घेण्यात येत आहे. १ ते १५ जुलैदरम्यान सार्वत्रिक औषधोपचार मोहीम (एमडीए) राबविण्यात येणार आहे. यात विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व यवतमाळ या पाच जिल्ह्यांसोबतच नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या सहा जिल्ह्यांपैकी गडचिरोली, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात तिहेरी औषधोपचार योजना (आयडीए) राबविण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

- नागपूर जिल्ह्यात १ टक्क्यापेक्षा कमी जंतुभार

मनपाच्या हिवताप व हत्तीरोग अधिकारी दीपाली नासरे यांनी सांगितले की, नागपूर शहर व ग्रामीणमध्ये राबविण्यात आलेल्या ‘ट्रिपल ड्रग’ मोहिमेचा काय प्रभाव पडला, यावरील सर्वेक्षण नुकतेच पार पडले. यात १ टक्क्यापेक्षा कमी जंतुभार आढळून आला. यामुळे हत्तीरोग नियंत्रणात असल्याचे यावरून दिसून आले. परंतु आता पुन्हा एक सर्वेक्षण केले जाणार असून, त्या आधारावर हत्तीरोगाची स्थिती कळू शकणार आहे.

Web Title: Excluded Nagpur from elephantiasis eradication campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.