विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 10:28 AM2024-11-19T10:28:36+5:302024-11-19T10:35:20+5:30
महायुतीत असलेले पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक प्रा. जोगेंद्र कवाडे यांची विशेष मुलाखत.
चारशे जागा आल्यावर आरक्षण बदलवू असे वक्तव्य भाजपच्या काही नेत्यांनी केल्यानंतर आम्हीच सर्वप्रथम विरोध केला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही दिली. लोकसभेला मविआने फेक नरेटीव्ह दिला, बदलले का संविधान? सत्तापक्षासोबत आम्ही असलो तरी संविधानाचे रक्षक म्हणून आहोत आणि राहू, अशी भावना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी लोकमतचे प्रतिनिधी योगेश पांडे यांना दिलेल्या मुलाखातीत व्यक्त केली.
प्रश्न : भाजप सत्तेवर आल्यावर संविधान बदलेल असा नॅरेटिव्ह पसरविण्यात येतो. आपले मत काय ?
उत्तर : संविधान हे १४० कोटींहून अधिक जनतेच्या जगण्याचा आधार आहे. कुणीही सत्तेवर आल्यावर संविधान बदलविणे अशक्य आहे. भाजप संविधानाशी छेडछाड करेल हा केवळ अपप्रचार होता हे लोकांनाही कळले आहे.
प्रश्न : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली धर्मनिरपेक्षता आणि काँग्रेसची धर्मनिरपेक्षता यात आपल्याला काही फरक जाणवतो का?
उत्तर : जमीन-आस्मानाचा फरक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायाचा विचार करत धर्मनिरपेक्षतेचे सूत्र मांडले होते. मात्र काँग्रेसची धर्मनिरपेक्षता ही मतांसाठीच आहे. निवडणुकीतच काँग्रेसला धर्मनिरपेक्षता आठवते. काँग्रेसला खरोखरच मागासवर्गीयांच्या भावनांची काळजी होती तर मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यासाठी त्यांनी १६ वर्षे संघर्ष का होऊ दिला? शेकडो भीमसैनिकांच्या रक्ताचे दान घेतल्यावरदेखील तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पुढाकार का घेतला नव्हता? खैरलांजीच्या घटनेत काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका काय होती, जरा आठवा!
प्रश्न : काँग्रेसची धर्मनिरपेक्षता व पुरोगामित्व विशिष्ट समाजाचे लांगुलचालन अशी टीका आपण करता, त्याचा आधार?
उत्तर : निश्चितच यात तथ्य आहे. राहुल गांधी यांनी त्यांची ‘मोहब्बत’ नेमकी कुणाच्या प्रति आहे ते स्पष्ट करावे. इतकी वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. मात्र बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली नाही. संसदीय समितीनेही अहवालात हे मांडले होते. काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेमध्ये इतकी वर्ष बाबासाहेबांचे विचार, मागासवर्गीयांचा सन्मान का आला नाही, हा सवाल आहे. काँग्रेस, शरद पवारांकडून सोयीनुसार पुरोगामित्वाचा वापर होतो.
प्रश्न : हिंदू कोड बिलाचा बाबासाहेबांनी नेहमीच आग्रह धरला होता काँग्रेसने त्याला विरोध केला, असा आरोप होतो, त्या बद्दल?
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू महिलांच्या हक्कांच्या रक्षणासाठी व समानतेसाठी हिंदू कोड बिल तयार केले होते. तत्कालिन पंतप्रधान पं.नेहरूंच्या आश्वासनावरून ते संसदेत सादर केले. मात्र त्यांच्या काही मंत्र्यांनी विरोध केला व नेहरू झुकले. त्यांनी हिंदू कोड बिल मागे घेतले व ही बाब बाबासाहेबांच्या मनाला धक्का देणारी ठरली. त्यांनी नाराजीतून मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
प्रश्न : काँग्रेसने भंडारा व दक्षिण मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीत पराभूत करण्याचे काम केले, असा आरोप नेहमीच होतो. आपण या चळवळीत इतकी वर्षे आहात आपले मत काय?
उत्तर : बाबासाहेबांचा महात्मा गांधींसोबत वैचारिक संघर्ष होता. गांधींना राजकीय स्वातंत्र्य महत्त्वाचे वाटत होते. सामाजिक मुक्तीकडे काँग्रेसचे दुर्लक्ष होत होते. बाबासाहेबांनी गांधीजींना विरोध केला म्हणून काँग्रेसने मनात राग ठेवला. घटनेच्या शिल्पकाराला निवडणुकीत पाडण्यासाठी षडयंत्र केले. अद्यापही काँग्रेसच्या मानसिकतेत फारसा बदल झालेला नाही हे कटूसत्य आहे.