बंधपत्रित अधिपरिचारिकांचा परीक्षेवर बहिष्कार

By admin | Published: July 18, 2016 02:43 AM2016-07-18T02:43:34+5:302016-07-18T02:43:34+5:30

नियमित सेवाभरतीसाठी आवश्यक असलेल्या विशेष लेखी परीक्षेला बंधपत्रित अधिपरिचारिकांनी विरोध दर्शवीत रविवारी बहिष्कार टाकला.

Execution of the bonded surrogate examiner | बंधपत्रित अधिपरिचारिकांचा परीक्षेवर बहिष्कार

बंधपत्रित अधिपरिचारिकांचा परीक्षेवर बहिष्कार

Next

उपसंचालक आरोग्य कार्यालयासमोर निदर्शने : परीक्षेत ५० टक्केच उपस्थिती
नागपूर : नियमित सेवाभरतीसाठी आवश्यक असलेल्या विशेष लेखी परीक्षेला बंधपत्रित अधिपरिचारिकांनी विरोध दर्शवीत रविवारी बहिष्कार टाकला. उपसंचालक आरोग्य विभाग कार्यालयातील परीक्षा केंद्रासमोर नारे-निदर्शने केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बंधपत्रित अधिपरिचारिकांची नियमित सेवाभरती करण्यासाठी १५ एप्रिल २०१५ च्या आदेशानुसार रविवारी उपसंचालक आरोग्य विभाग कार्यालयात विशेष लेखी परीक्षा घेण्यात आली. परंतु ही अट अन्यायकारक असून महाराष्ट्र गव्हर्नमेंट विदर्भ नर्सेस असोसिएशनने याला विरोध दर्शवीत जोरदार नारेबाजी केली. असोसिएशनच्या रजनी लोखंडे म्हणाल्या, विभागीय निवड मंडळ समितीमार्फत मुलाखत व परीक्षा देऊनच बंधपत्रित अधिपरिचारिकांची निवड करण्यात आली. निवड झालेल्यांना शासनाच्या आदेशानुसार १८ महिन्यांचे बंधपत्र देण्यात आले. या कालावधीत ग्रामीण भागात समाधानकारक कार्य केल्यानंतर इच्छुकांना वेळीच सेवा नियमितता प्रमाणपत्र देणे अपेक्षित होते. परंतु १५ ते २० वर्षे शासकीय सेवेत कार्यरत असतानाही नियमिततापासून वंचित ठेवले. परिणामी, वरिष्ठ शिक्षण कालबद्ध पदोन्नती, आंतरमंडळ बदली सेवेपासून वगळण्यात आले. विशेष म्हणजे, सार्वजनिक आरोग्य विभाग महासंचालकांनी २००३ च्या आदेशान्वये अर्ध्याअधिक अधिपरिचारिकांना नियमित केले. परंतु याच कालावधीतील राज्यभरातील १०५९ बंधपत्रित अधिपरिचारिकांना यातून वगळण्यात आले. याविरोधात आंदोलन उभारल्यानंतर १५ एप्रिल २०१५ रोजी आदेश काढण्यात आले. यात बंधपत्रित अधिपरिचारिकांसाठी तीनवेळा विशेष लेखी परीक्षा घेण्याचा, यात उत्तीर्ण न झालेल्यांची सेवा समाप्त करण्याचा आणि पास झाल्यास त्याची सेवाज्येष्ठता डावलून नियमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परंतु अधिपरिचारिका अखंडित सेवा देत असताना, आता परीक्षेचे वयही राहिले नसताना, नियमित सेवाभरतीसाठी विशेष लेखी परीक्षा देण्याची अट अन्यायकारक असल्याने याला विरोध करीत आहे. यासंदर्भातील लेखी निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्यमंत्री, प्रधान सचिव व संचालकांना देण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
बंधपत्रित अधिपरिचारिकांनी विशेष लेखी परीक्षेला विरोध केला असला तरी १८७ पैकी ५० टक्के उमेदवार परीक्षेला बसले. सायंकाळी यात पास झालेल्यांची यादीही जाहीर करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Execution of the bonded surrogate examiner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.