नररुपी सैतान राजू बिरहाची फाशी रद्द, हायकोर्टाने सुनावली ३० वर्षे कारावासाची शिक्षा

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: October 31, 2023 04:01 PM2023-10-31T16:01:52+5:302023-10-31T16:03:41+5:30

तीन मित्रांची शहाळे कापण्याच्या सत्तूरने निर्घृण हत्या करणारा गुन्हेगार

Execution of notorous criminal Raju Birha canceled, HC sentences him to 30 years imprisonment | नररुपी सैतान राजू बिरहाची फाशी रद्द, हायकोर्टाने सुनावली ३० वर्षे कारावासाची शिक्षा

नररुपी सैतान राजू बिरहाची फाशी रद्द, हायकोर्टाने सुनावली ३० वर्षे कारावासाची शिक्षा

नागपूर : वागदरा शिवार येथील चहा व पान टपरीच्या जागेवरून वाद झाल्यानंतर तीन मित्रांची शहाळे कापण्याच्या सत्तूरने निर्घृण हत्या करणारा नररुपी सैतान राजू छन्नूलाल बिरहा (५५) याची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने रद्द करून त्याला ३० वर्षे कारावासाची सुधारित शिक्षा सुनावली. न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांनी मंगळवारी हा निर्णय जाहीर केला.

ही दुर्मिळातली दुर्मिळ घटना नाही. त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही. परंतु, आरोपीने तीन जणांची निर्घृण हत्या केली आहे. त्यासाठी त्याला ३० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. तसेच, सरकारला त्याला या शिक्षेत सूट देता येणार नाही, असे उच्च न्यायालय निर्णयात म्हणाले.

सत्र न्यायालयाने बिरहाला २८ डिसेंबर २०२२ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम ३६६ अनुसार या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी त्यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाने हे प्रकरण उच्च न्यायालयासमक्ष सादर केले होते. तसेच, या शिक्षेविरुद्ध बिरहाने अपील दाखल केले होते. त्यावर गेल्या जुलैमध्ये अंतिम सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला होता.

समाजाला हादरवून सोडणारी ही घटना १७ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी १० च्या सुमारास वागदरा शिवार, ता. हिंगणा येथे घडली होती. मृतांमध्ये सुनील हेमराज कोटांगळे (३१), आशिष ऊर्फ गोलू लहुभान गायकवाड (२६) व कैलाश नारायण बहादुरे (३२) यांचा समावेश आहे. आरोपी राजू बिरहाने अत्यंत क्रूर व अमानवीय पद्धतीने हा गुन्हा केला. त्याने आधी बहादुरेवर हल्ला केला होता. कोटांगळे त्याला वाचविण्यासाठी गेला असता, शरीरात सैतान संचारलेला बिरहा बहादुरेला सोडून कोटांगळेवर तुटून पडला. बिरहाने कोटांगळेच्या पोटावर, गळ्यावर व डोक्यावर सत्तूरचे सपासप वार केले. तो कोटांगळेला ठार करीत असताना जखमी बहादुरे व गायकवाड संदेश सिटीच्या रस्त्याने पळून गेले. त्यामुळे बिरहारने बहादुरेला पाठलाग करून पकडले व त्याचाही निर्घृण खून केला.

दरम्यान, दूरपर्यंत पळून गेलेल्या गायकवाडला बिरहाने दुचाकीवरून पाठलाग करून पकडले व त्यालादेखील जाग्यावरच ठार मारले. आरोपी बिरहा व कोटांगळे हे दोघेही वृंदावन सिटी गृह प्रकल्पापुढे चहा व पान टपरी चालवित होते. उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. संजय डोईफोडे तर, आरोपीतर्फे वरिष्ठ ॲड. अनिल मार्डीकर व ॲड. सुमित जोशी यांनी कामकाज पाहिले.

बिरहा कुख्यात गुन्हेगार

राजू बिरहा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध नागपुरातील सदर, अंबाझरी व सोनेगाव पोलीस ठाण्यातही विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला हद्दपार केले होते.

Web Title: Execution of notorous criminal Raju Birha canceled, HC sentences him to 30 years imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.