याकूबच्या फाशीने अखेरच्या क्षणी भरली होती धडकी

By admin | Published: July 30, 2016 02:18 AM2016-07-30T02:18:35+5:302016-07-30T02:18:35+5:30

सर्व तयारी झाली होती. जवळपास पूर्णच कारागृह प्रशासन फाशीच्या अंमलबजावणीसाठी सज्ज होते.

The execution of Yakub was in the final moment | याकूबच्या फाशीने अखेरच्या क्षणी भरली होती धडकी

याकूबच्या फाशीने अखेरच्या क्षणी भरली होती धडकी

Next

टीम नागपूरही आली होती दडपणात : वर्षभरानंतर खुलासा
नरेश डोंगरे नागपूर
सर्व तयारी झाली होती. जवळपास पूर्णच कारागृह प्रशासन फाशीच्या अंमलबजावणीसाठी सज्ज होते. परंतु, २९ जुलैच्या मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या घडामोडीमुळे ‘आॅपरेशन याकूब’ राबविणारी ‘टीम नागपूर’ अस्वस्थ झाली होती. फाशी होणार की टळणार, या मुद्याने अनिश्चितता नव्हे थरार वाढवला होता. त्यामुळे शेवटच्या घटकेपर्यंत आम्ही प्रचंड दडपणात होतो, अशी माहितीवजा कबुली याकूबच्या फाशीची अंमलबजावणी करण्यात मुख्य भूमिका वठविणारे कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांनी शुक्रवारी लोकमतशी बोलताना दिली.
देश हादरवणाऱ्या १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील सिद्धदोष आरोपी याकूब अब्दुल रज्जाक मेमन याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ३० जुलै २०१५ ला सकाळी ७ वाजता फाशी देण्यात आले. ३० जुलै रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर, लोकमत प्रतिनिधीने कारागृहातील सुरक्षा आढावा घेतानाच अधीक्षक देसाई यांच्याशी बातचित केली.
देसाई यांनी २६ / ११ चा आरोपी, पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला पुण्याच्या येरवडा कारागृहात फासावर टांगले. कसाब नंतर संसद हल्ल्याचा आरोपी अफजल गुरू याला फाशी देण्यात आले.
या दोन्ही फाशीच्या घटनेनंतर शत्रुघ्न चव्हाण या याचिकाकर्त्याने न्यायालयात फाशीच्या शिक्षेच्या अनुषंगाने याचिका सादर केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून याकूबच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करायची होती. २०१४ नंतरची ही पहिलीच फाशी होती. त्यामुळे प्रारंभापासूनच दडपण होते. वरिष्ठ आणि अन्य संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने फाशीच्या शिक्षेची प्रक्रिया महिनाभरापासूनच नागपुरात सुरू झाली. मार्च २०१५ मध्ये जेल ब्रेक झाले.

४८ तास कुणी झोपलेच नाही
२९ जुलैच्या मध्यरात्री विलक्षण नाट्य घडले. त्यामुळे ४८ तासांपासून ‘आॅपरेशन याकूब’साठी अविश्रांत कार्यरत ‘असलेल्या टीम नागपूर’मधील अस्वस्थता तीव्र झाली. राज्यपालांनी फेटाळलेल्या दयेच्या अर्जाला आव्हान देत याकूबच्यावतीने देशातील काही नामवंत वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे धाव घेतली. त्यानंतर ऐतिहासिक घडामोडी सुरू झाल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ खंडपीठापुढे पहाटेपर्यंत याकूबचे वकील आणि सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. तो चार-साडेचार तासांचा कालावधी प्रचंड थरारक होता. नागपूर-मुंबई-दिल्लीचा निरंतर संपर्क सुरू होता. दर तासा-अर्ध्या तासात फोन खणखणत होता. तशी अस्वस्थता तीव्र होत होती. फाशी होणार की नाही, त्याबाबत संभ्रम होता. परिणामी घालमेल वाढली होती. अखेर ४.४६ वाजता याकूबच्या वकिलांनी केलेले सर्व दावे फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने फाशीवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळाली अन् ...याकूबला फाशी देण्यात आल्यानंतरही पुढचे १२ तास टीम नागपूर जागीच होती. आज तो घटनाक्रम आठवताना तो थरारही आठवतो, असे देसाई सांगतात.
सर्व ठिकठाक मात्र...
याकूबच्या फाशीला एक वर्षाचा कालावधी झाला. कारागृहाच्या आतबाहेरच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठा बदल झाला आहे. सर्व ठीकठाक आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून आजही कारागृहातील पश्चिम तसेच उत्तर-दक्षिणेकडील प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले होते. कारागृहाच्या आतमधील (मुख्य प्रवेशद्वार) परिसरात मोठ्या संख्येत पोलीस तैनात होते. अर्धा डझन वाहने आणि अ‍ॅम्बुलन्सही सज्ज होती. प्रत्येकाला दूरवरच थांबवून पूर्ण तपासणी केल्यानंतर प्रवेश दिला जात होता. कारागृहाच्या बाहेर २९ जुलै २०१५ च्या वातावरणाची अनुभूती येत होती. तर आतमधील व्यवस्थाही याकूबच्या फाशीच्या वर्षपूर्तीची आठवण करून देत होती.

 

Web Title: The execution of Yakub was in the final moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.