गर्दीतील व्यायाम, कोरोनाला आमंत्रण : नागरिकांनी मॉर्निंग वॉकला एकत्र येणे टाळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 12:28 AM2020-03-20T00:28:26+5:302020-03-20T00:30:07+5:30
सकाळी उठून व्यायाम करणे हे कधीही हिताचेच असते व अनेकजण जर ‘मॉर्निंग वॉक’ला प्राधान्य देतात. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र गुरुवारी शहरातील अनेक ‘वॉकिंग स्ट्रीट’वर या आवाहनालाच नागरिकांनी हरताळ फासल्याचे चित्र होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सकाळी उठून व्यायाम करणे हे कधीही हिताचेच असते व अनेकजण जर ‘मॉर्निंग वॉक’ला प्राधान्य देतात. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र गुरुवारी शहरातील अनेक ‘वॉकिंग स्ट्रीट’वर या आवाहनालाच नागरिकांनी हरताळ फासल्याचे चित्र होते. सिव्हील लाईन्ससह काही भागात ‘मॉर्निंग वॉक’साठी लोकांची गर्दी झाली होती. ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न होत असताना नागरिकांची अशी बेजबाबदारी आजाराला आमंत्रण देणारीच ठरू शकते, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
प्रशासनाने शहरातील ‘जिम्स’, उद्याने बंद केली आहे. शिवाय पश्चिम नागपुरातील अनेक लोक ‘एलआयटी’मध्येदेखील सकाळी फिरायला जातात. मात्र तेथेदेखील विद्यापीठ प्रशासनाने ‘मॉर्निंग वॉक’ला काही दिवस मज्जाव केला आहे. अशा स्थितीत अनेकांनी थेट ‘सिव्हील लाईन्स’मधील हिरवळीचा भाग गाठला. एरवीपेक्षा जास्त गर्दी दिसून आली. आश्चर्याची बाब म्हणजे अनेक जण खबरदारीदेखील घेताना दिसून आले नाही. मुख्यमंत्र्यांचे नागपुरातील शासकीय निवासस्थान असलेल्या ‘रामगिरी’ समोरील मार्गावर तर जास्तच गर्दी दिसली. काही अतिउत्साही तरुणांनी चक्क रस्त्यावरच ‘पुश अप्स’ मारल्या. हे करत असताना एकमेकांपासून अंतर ठेवण्याचेदेखील त्यांना भान राहिले नाही. अशा पद्धतीचा व्यायाम हा तर ‘कोरोना’ला आमंत्रण देणाराच ठरू शकतो.
प्रशासनाचे आवाहन गंभीरतेने घ्या
जिल्हाधिकारी, आरोग्य यंत्रणा यांच्याकडून वारंवार ‘कोरोना’पासून बचावासंदर्भात आवाहन करण्यात येत आहे.नागरिकांनी जास्त गर्दी करू नये, बाहेर निघाल्यावर आवश्यक खबरदारी बाळगावी, एकमेकांपासून अंतर ठेवावे, स्वच्छता ठेवावी, असे विविध माध्यमातून सांगण्यात येत आहे. ‘कोरोना’बाबत हे आवाहन सर्वांनीच गंभीरतेने घेण्याची आवश्यकता आहे.
घरीच करा व्यायाम
पुढील काही दिवस हे नागपूरकरांसाठी परीक्षेचे आहे. अशा स्थितीत ‘मॉर्निंग वॉक’साठी जाऊन एखाद्या जागी गर्दी करणे योग्य ठरणार नाही. यापेक्षा नागरिक घरीदेखील व्यायाम करू शकतात. विविध योगासने, व्यायामपद्धती इत्यादींचा वापर होऊ शकतो.
इतरांप्रमाणे पुढाकार घ्या
शहरातील ‘जिम्स’ बंद असल्याने दररोज व्यायाम करणाऱ्यांची काहिशी गैरसोय झाली आहे. परंतु ‘कोरोना’संदर्भात सामाजिक जबाबदारी समजत काही तरुणांनी घरीच व्यायामाचे ‘बेसिक’ साहित्य घेतले आहे. त्यांच्याप्रमाणे इतरांनीदेखील पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.