डोसचा पुरेसा पुरवठा नसल्याने उत्साहावर विरजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:33+5:302021-06-29T04:07:33+5:30
सहा दिवसात दोन दिवस बंद असूनही ९६ हजाराहून अधिक लसीकरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : युवकांचा लसीकरणाला उत्साही प्रतिसाद ...
सहा दिवसात दोन दिवस बंद असूनही ९६ हजाराहून अधिक लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : युवकांचा लसीकरणाला उत्साही प्रतिसाद आहे. याचा विचार करता मनपाने लसीकरण केंद्रांची संख्या १०५ वरून १२२ केली. परंतु लसीचे डोस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहीम प्रभावित होत आहे. गुरुवारपासून एक दिवसाआड लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत आहे. यामुळे डोस घेणाऱ्यांना अडचणी येत आहेत. नागपूर शहराला ३० ते ४० हजार डोस उपलब्ध होत आहेत.
नागपुरात मागील सहा दिवसांपैकी दोन दिवस लसीकरण बंद होते. चार दिवसात विक्रमी ९६,४३६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यात १८ ते ४४ वयोगटातील ६९८९७ लाभार्थी आहेत. ते एकूण लाभार्थ्यांच्या ७२.४५ टक्के आहेत. लस ही कोविडवर ब्रह्मास्त्र असल्याचे युवकांना माहीत असल्याने ते प्रतिसाद देत आहेत. परंतु पुरेसा पुरवठा होत नसल्याने त्यांच्या उत्साहावर विरजण पडत आहे.
२१ जूनला १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. २२ जूनपासून महाराष्ट्रात सुरुवात करण्यात आली. नागपुरात २३ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याला सुरूवात झाली. पहिल्या दोन दिवसात विक्रमी लसीकरण झाले. परंतु २५ व २७ जूनला डोस उपलब्ध नसल्याने केंद्र बंद ठेवण्यात आले. मंगळवारी २९ जूनला पुन्हा केंद्र बंद ठेवण्याची घोषणा मनपाने केली आहे. १८ वर्षावरील लसीकरणाला गती मिळण्यासोबतच भारत जगात सर्वाधिक लसीकरण करणारा देश झाला आहे.
कोविशिल्ड नाही, आज केंद्र बंद
शासनाकडून नागपूर महापालिकेला कोविशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रावर मंगळवारी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, मात्र मेडिकल कॉलेज, प्रभाकरराव दटके रोगनिदान केंद्र व बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात कोव्हॅक्सिन डोस उपलब्ध असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
....
शहरातील लसीकरणाची स्थिती
दिनांक एकूण लसीकरण १८ ते ४४ वयोगट
२३ जून २३७०३ २०२६१
२४ जून २००५५ १५८०९
२५ जून ०० ००
२६ जून २२३६५ १३९६०
२७ जून ०० ००
२८ जून २२३६५ १३९६०
टीप - २५ व २७ जूनला लसीकरण बंद होते.