शेवाळांमुळे तलावांचे अस्तित्व धाेक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:09 AM2021-09-11T04:09:23+5:302021-09-11T04:09:23+5:30

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : ठिकठिकाणी असलेले छाेटे-माेठे तलाव हे रामटेक तालुक्याचे वैशिष्ट्य आहे. अलीकडच्या काळात बहुतांश ...

The existence of lakes is threatened by algae | शेवाळांमुळे तलावांचे अस्तित्व धाेक्यात

शेवाळांमुळे तलावांचे अस्तित्व धाेक्यात

googlenewsNext

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : ठिकठिकाणी असलेले छाेटे-माेठे तलाव हे रामटेक तालुक्याचे वैशिष्ट्य आहे. अलीकडच्या काळात बहुतांश तलावांमध्ये शेवाळ, जलपर्णी व इतर घातक जलवनस्पती माेठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे या तलावांचे साैंदर्य लयास जात असून, त्यांच्या अस्तित्वाला धाेका उद्भवण्याची शक्यता बळावली आहे. शिवाय, या तलावांमधील मासेमारी व्यवसायदेखील संकटात सापडला आहे. प्रशासनाची उदासीनता आणि प्रदूषण यामुळे तलावांचे अस्तित्व धाेक्यात आले आहे, अशी माहिती काही जाणकार व्यक्तींनी दिली.

रामटेक शहर हे पर्यटनस्थळ आहे. शहराचा चहू भाग तलावांनी वेढला आहे. यात अंबाळा, खिंडसी, गहू, नव, बाेटी, चांभारडाेब, नागारा, महार, राखी या नऊ तलावांचा समावेश आहे. यातील नव, नागारा, बाेटी, चांभारडाेब व कथला बाेडी हे तलाव बारई समाजाच्या संस्थेचे आहे. इतर तलाव रामटेक नगरपालिकेच्या मालकीचे आहेत.

यातील बहुतांश तलावांमधील पाणी हिरवेगार झाल्याचे दिसून येते. या तलावांना शेवाळ, जलपर्णी व इतर जलवनस्पतींनी विळखा घातला आहे. नागारा तलावात माेठ्या प्रमाणात शेवाळ तयार झाल्याने हा तलाव दुरून हिरवागार दिसताे. हा तलाव आहे की हिरवीगार जमीन, हेही कळायला मार्ग नाही. नव तलावातसुद्धा हिरव्या जलवनस्पती माेठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या वनस्पतीला निळी फुले येतात. त्यामुळे या तलावातील पाणी नजरेत पडत नाही.

या पाणवनस्पतींमुळे तलावातील जलचर प्राण्यांचा पुरेसा ऑक्सिजन व सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे तलावांमधील इतर जलचर प्राण्यांसाेबत मासेही धाेक्यात येऊ शकतात. बारई समाजाचे तलाव मासेमारीसाठी कंत्राटी पद्धतीने दिले जातात. पूर्वी या तलावांमधील पाण्याचा वापर पानमळ्यांच्या ओलितासाठी केला जायचा. त्यामुळे तलावांची अवस्था चांगली असायची. ते स्वच्छ ठेवले जायचे. या भागातील माेठ्या विहिरीही नामशेष झाल्या आहेत.

...

देखभाल, दुरुस्ती, साफसफाई शून्य

यातील काही तलावांमध्ये रामटेक परिसरातील पाणी साेडले जाते. त्यामुळे तलावातील पाणी दूषित झाल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. या तलावांमधील गाळ कित्येक वर्षांपासून काढण्यात न असल्याने त्यांची पाणीसाठवण क्षमता कमी झाली आहे. तलावांच्या लगतची व परिसरातील झुडपे साफ केली जात नाहीत. खाेलीकरण करण्यात न आल्याने तलावांचा विस्तार हाेण्याऐवजी संकुचित झाले. या तलावांचा विस्तार माेठा असून, काही तलाव राेडलगत आले आहेत.

...

मृत डुकरं टाकण्यासाठी वापर

पूर्वी चांभारडाेह तलावातील कमळाची फुले दर्जेदार असायची. अलीकडे या तलावात मृत डुकरं टाकली जातात. हा तलाव काहींचे शाैचालयाचे आवडते ठिकाण बनला आहे. या संपूर्ण तलावाच्या देखभाल व दुरुस्तीकडे कुणाचेही लक्ष नाही. लाेकप्रतिनिधी व नेते त्यांच्या राजकारणात मश्गुल राहतात. नागरिकांनाही या तलावांचे काही घेणे-देणे नाही. या समस्येकडे आणखी काही वर्षे दुर्लक्ष केल्यास रामटेक शहरालगतचे बहुतांश तलाव इतिहासजमा हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

...

जबाबदारी स्वीकारणार काेण?

या सर्व तलावांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांची साफसफाई, खाेलीकरण व दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी माेठ्या प्रमाणात पैसा लागताे. बारई समाजाकडे निधीची कमतरता आहे. शेवटी त्या सर्व तलावांचा फायदा समाजातील सर्व घटकांनाच हाेताे. त्यामुळे शासनाने या तलावाच्या दुरुस्तीसाठी पुरेसा निधी द्यायला हवा. लाेकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा करावा, निधी प्राप्त हाेताच त्याचा याेग्य विनियाेग कसा हाेईल, याचा विचार करायला हवा.

Web Title: The existence of lakes is threatened by algae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.