महापालिकेचे अस्तित्व स्मार्ट सिटीमुळे धोक्यात
By admin | Published: January 3, 2016 03:32 AM2016-01-03T03:32:16+5:302016-01-03T03:32:16+5:30
महापालिका प्रशासन स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामात व्यस्त आहे. पदाधिकारी व अधिकारी या प्रकल्पाची प्रशंसा करीत आहे.
विविध संघटनांचा विरोध : महापौरांना निवेदन
नागपूर : महापालिका प्रशासन स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामात व्यस्त आहे. पदाधिकारी व अधिकारी या प्रकल्पाची प्रशंसा करीत आहे. परंतु यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘स्पेशल पर्पज व्हेईकल ’(एसपीव्ही) विरोधात विविध संघटना एकत्र आल्या असून त्यांनी या प्रकल्पामुळे महापालिकेचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचा दावा केला आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्प घटनेच्या ७४ व्या सुधारणेच्या विरोधात असून यामुळे सत्ता व नियोजनाचे केंद्रीकरण होणार आहे. त्यामुळे या विरोधात विविध संघटनांमार्फत १० जानेवारीपासून जनजागृती अभियान राबवून नागरिक परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष जम्मू आनंद यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.
शहर वाहतुकीपाठोपाठ पाणीपुरवठ्याची जबाबदारी खासगी संस्थेकडे देण्यात आली. आता स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून शहराचा विकास खासगी संस्थांकडे सोपविला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेचे अस्तित्वच धोक्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्रमिक संघटना संयुक्त कृ ती समितीचे अनिल हजारे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय शेंडे, मुस्लीम महिला मंचच्या शाहिना शेख, यांच्यासह सी.एन.आय.समाज सेवी संस्था, असेम्ब्ली कामगार संयुक्त कृती समिती, शहर विकास मंच, किन्नर सर्वसेवा समाज, सारभी ट्रस्ट, प्रगतीशील लेखक संघ, सुरक्षा रक्षक कामगार संघटना, जनजागृती आवाहन मंच, मनपा ऐवजदार कामगार संघटना, यांच्यासह २२ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याबाबत महापौर प्रवीण दटके यांना निवेदन दिल्याची माहिती आनंद यांनी दिली.(प्रतिनिधी)