विस्तार करा, युवकांना रोजगार द्या : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 08:54 PM2019-03-08T20:54:30+5:302019-03-08T23:13:05+5:30

मॅग्निज ओअर ऑफ इंडिया लि.ने (मॉयल) नफा कमवून सरकारला न देताना प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठीच उपयोगात आणावा. मॉयलने विस्ताराचे विविध प्रकल्प हाती घ्यावेत आणि स्थानिक युवकांना रोजगार द्यावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Expand, give jobs to youth: Nitin Gadkari | विस्तार करा, युवकांना रोजगार द्या : नितीन गडकरी

मॉयलच्या चार विस्तारित प्रकल्पाच्या ई-भूमिपूजनाप्रसंगी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंचावर खा. कृपाल तुमाने, डॉ. विकास महात्मे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, मॉयलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकुंद चौधरी आणि इतर मान्यवर.

Next
ठळक मुद्देमॉयलच्या चार प्रकल्पाचे ई-भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मॅग्निज ओअर ऑफ इंडिया लि.ने (मॉयल) नफा कमवून सरकारला न देताना प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठीच उपयोगात आणावा. मॉयलने विस्ताराचे विविध प्रकल्प हाती घ्यावेत आणि स्थानिक युवकांना रोजगार द्यावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्रीनितीन गडकरी यांनी केले.
मॉयलच्या चार विस्तारित प्रकपाचे ई-भूमिपूजन खापा येथे गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. मंचावर खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, मॉयलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकुंद चौधरी, उत्पादन संचालक दीपांकर सोम, वित्त संचालक राकेश तुमाने, मानव संशाधन संचालक उषा सिंग, मुख्य दक्षता अधिकारी शरदचंद्र तिवारी उपस्थित होते. मॉयलच्या परसोडी मॅग्निज ओअर माईन, मनसर माईन येथे देव स्कूल, हायस्पीड शॉफ्ट गुमगांव माईन, गुमगाव फेरो अलॉईज प्रकल्प या चार प्रकल्पाचे भूमिपूजन गडकरी यांनी बटन दाबून केले.
विस्तारित प्रकल्प सार्थकी ठरणार
गडकरी म्हणाले, विस्तारित फेरो अलॉय प्रकल्प गुमगांव येथे सुरू करून आश्वासनाची पूर्तता केली आहे. २००२ पासून सुरू असलेल्या प्रकल्पाची क्षमता आता ९० हजार मेट्रिक टनवरून अडीच लाख मेट्रिक टनावर जाणार आहे. या प्रकल्पात ४०० युवकांना रोजगार मिळेल आणि व्यवसाय वाढेल, ही आनंदाची गोष्ट आहे. प्रकल्पात खापा येथील युवकांना घ्या, सावनेरचा विचार नंतर करा. या भागातील हातमाग उद्योग मोडकळीस आल्यामुळे रोजगार हिरावला आहे. या प्रकल्पामुळे मॅग्निजपासून जोडधंदे सुरू होतील. छोट्याछोट्या उद्योगांमुळे युवकांना काम मिळाल्यास हा विस्तारित प्रकल्प सार्थकी ठरेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
खापाच्या ऋणातून मुक्त झालो
मॉयलने मिहानप्रमाणेच येथील युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याचे आवाहन गडकरी यांनी चौधरी यांना केले. वेस्टर्न कोलफिड आता खाणीतून ८०० ते १००० कोटी रुपयांची रेती विकणार आहे. मॉयलने खाणीतून रेती काढून विक्री करावी. ग्रीन हायवे करण्यासाठी पुढाकार घ्यावा, सावनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वृक्षारोपण करावे, रेमंड कंपनी खापा येथे शाळा सुरू करण्यास इच्छुक आहे, त्यामुळे मॉयलने मनसरप्रमाणेच खापा येथे चांगली शाळा सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्याचा फायदा या परिसरातील विद्यार्थ्यांना होईल. मॉयलच्या विस्तारित प्रकल्पासाठी पुढाकार घेतल्यामुळे आता खापाच्या ऋणातून मुक्त झाल्याचे गडकरी म्हणाले. मुकुंद चौधरी म्हणाले, ओपन कास्ट परसोडा मॅग्निज खाण ५३.७५ हेक्टरवर असून वार्षिक उत्पादन ४० हजार टीपीए असे राहील. या प्रकल्पात १९.५४ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून २०० युवकांना रोजगार मिळेल. खाण २०१९-२० मध्ये सुरू होणार आहे. सामाजिक उपक्रमांतर्गत मनसर खाण येथे १० कोटींच्या गुंतवणुकीतून डीएव्ही शाळा बांधण्यात येणार आहे. शैक्षणिक सत्र २०२१-२२ पासून सुरू होईल. गुमगांव माईन येथे हाय स्पीड शॉफ्ट प्रकल्पात १९४.९१ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. प्रकल्पाची सुरुवात २०१९ ला होऊन २०२१ ला पूर्ण होईल. उत्पादन २०२२ पासून सुरू होणार आहे. वार्षिक क्षमता २.५ लाख टन मॅग्निज ओअरची आहे. या प्रकल्पात ४०० युवकांना रोजगार मिळेल. तसेच १५५ कोटींच्या गुंतवणुकीतून उभारण्यात येणाऱ्या गुमगांव फेरो अलॉय प्रकल्पात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ३०० जणांना रोजगार मिळणार आहे. प्रकल्प डिसेंबर २०२१ पासून सुरू होणार आहे. उत्पादन क्षमता २५ हजार टीपीए सिलिको मॅग्निज एवढी आहे. 

‘बावनकुळे रस्ता’ असे नाव!
सावनेर ते भंडारापर्यंत रस्ता बांधण्याची चंद्रशेखर बावनमुळे यांची मागणी पूर्ण केली आहे. या रस्त्यामुळे युवकांना व्यवसायासाठी फायदा होणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे नाव आता ‘बावनकुळे रस्ता’ असे असल्याचे आपण गमतीने म्हणत असल्याचे गडकरी म्हणाले.

Web Title: Expand, give jobs to youth: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.