पदोन्नतीच्या निकषात विस्तार, आता सामान्यांनाही मिळणार संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:09 AM2021-06-09T04:09:07+5:302021-06-09T04:09:07+5:30
नागपूर: पदोन्नतीमधील आरक्षण संपविल्यानंतर आता राज्यात पदोन्नतीसाठी निर्धारित असलेल्या नियमावलीमध्ये शिथिलता देऊन सर्वांना संधी देण्यास सुरुवात झाली आहे. एमएसईबी ...
नागपूर: पदोन्नतीमधील आरक्षण संपविल्यानंतर आता राज्यात पदोन्नतीसाठी निर्धारित असलेल्या नियमावलीमध्ये शिथिलता देऊन सर्वांना संधी देण्यास सुरुवात झाली आहे. एमएसईबी होल्डिग कंपनीने पदोन्नतीसाठी असलेली मानके शिथिल करण्याचा आदेश जारी केला आहे. यानुसार, उत्कृष्ट आणि सामान्य कार्य करणारे सारेच पदोन्नतीसाठी पात्र ठरणार आहेत.
उल्लेखनीय असे की, मागील पाच वर्षांच्या कामकाजावर आधारित पदोन्नती दिली जात असते. सी.आर. (गोपनीय रिपोर्ट) नुसार दरवर्षी गुण दिले जातात. महावितरण आणि महाजेनकोमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी पाच वर्षात १८ ते २२ गुण मिळविणाऱ्यांना संधी मिळत असे. अधिकारी दरवर्षी किमान ५ गूण मिळवू शकतात. उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पाच गुण मिळतात. अतिउत्तम शेरा असणाऱ्यांसाठी पाच गुण, उत्तमसाठी चार, चांगलेसाठी तीन, सामान्य शेरासाठी दोन आणि निकृष्ट दर्जाच्या कामासाठीही एक गुण मिळतो. पदोन्नतीसाठी निर्धारित गुणांपर्यंत पोहचण्याकरिता मागील पाच वर्षात किमान दोन वेळा आउटस्टँडिंग गुण मिळविणे आवश्यक असते. मात्र आता असे गुण न मिळविणारेही मुख्य अभियंता पदापर्यंत पोहोचू शकतात. सर्वांना पदोन्नतीची संधी मिळावी, यासाठी हा निर्णय झाला असावा, असा होल्डिंग कंपनीचा अंदाज आहे. मात्र, महाजेनकोसाठी हा तर्क लागू नाही. कारण येथे गुणांची मर्यादा जुन्यासारखीच ठेवली आहे.
...
अटी-शर्तीवर होणार पदोन्नती
पदोन्नतीसाठी ठरविलेले गुण कमी करण्यावर कुणीही अधिकारी बोलायला तयार नाहीत. दरम्यान, होल्डिंग कंपनीच्या बोर्ड मिटिंगमध्ये हा निर्णय झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली. सर्वच वीज कंपन्यांना हा निर्णय मान्य करावा लागणार आहे. आरक्षण वाढविल्यास किंवा मराठा आरक्षण मंजूर झाल्यास यात पुन्हा फेरबदल होऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणाच्या निर्णयानुसार पदोन्नतीमध्ये बदल होऊ शकतो, असे पदोन्नती मिळणाऱ्यांच्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेले राहणार आहे.
...