सरकारकडून होती अपेक्षा, पण खाद्यतेलाच्या दराने वाढविली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:17 AM2021-01-08T04:17:52+5:302021-01-08T04:17:52+5:30
नागपूर : सोयाबीन तेलासह सर्वच खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईने डंख मारला आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात ...
नागपूर : सोयाबीन तेलासह सर्वच खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईने डंख मारला आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात काही महिलांशी चर्चा करून मते जाणून घेतली असता अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली आणि महागाईबद्दल चिंताही बोलून दाखविली.
अश्विनी मेश्राम म्हणाल्या, कोरोनामुळे आधीच रोजगार गेले आहेत. आर्थिक संकटाशी सर्वजण सामना करीत असताना महागाईवर नियंत्रण आणण्याऐवजी खाद्यतेलाचे दर वाढले. यामुळे घराचे बजेट बिघडले आहे.
टेका (नवी वस्ती) येथील अफसाना खान या गृहिणी म्हणाल्या, भाजपाने सहा वर्षापूर्वी निवडणुकांच्या आधी महागाईचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र या सहा वर्षात महागाई वाढली. गॅस सिलिंडरपाठोपाठ आता खाद्यतेलही महागले. यूपीए सरकारचाच काळ चांगला होता, असे आता वाटते.
मानकापूर शिवाजी कॉम्प्लेक्समधील नैना राव डेव्हिड म्हणाल्या, घरगुती वापराच्या वस्तूच्या भाववाढीमुळे घराचे बजेट विस्कळीत झाले आहे. खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या. आता बराच सांभाळून खर्च करावा लागणार आहे.
मिसाळ ले-आऊट येथील गृहिणी शालू संजय पाटील म्हणाल्या, वाढत्या महागाईवर सरकारचे नियंत्रण राहिलेले नाही. खाद्यतेलाचा वापर रोज असल्याने खर्च वाढणार आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक ताण आहे, त्यात ही भर पडणार आहे.
गृहिणी मोनू चोपडे म्हणाल्या, सरकारने परिस्थिती लक्षात घेऊन किमती कमी कराव्यात. असेच होत राहिले तर घरखर्च चालविणे कठीण होईल.
इंदिरामातानगरातील सायत्रा परतेकी म्हणाल्या, खाद्यतलाचे भाव वाढविणे हे सरकारचे अपयश आहे. यावरून सर्वसामान्यांची सरकारला जराही चिंता नाही, हेच दिसते.
जरीपटका धील प्रियंका लारोकर म्हणाल्या, घराचा सर्वात अधिक खर्च खाद्यतेलावर असतो. या आर्थिक संकटाच्या दिवसात सरकारने दरवाढ नियंत्रणात करायला हवी.
खुशीनगरच्या रत्नमाला माहुरकर म्हणाल्या, सिलिंडरच्या किमती वाढल्याने एकेकाळी बरीच ओरड केली जायची. आता ते दर प्रचंड वाढले, खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. यामुळे आवडीची पक्वान्ने खातानाही विचार करावा लागणार आहे.