"खोकेबाज, धोकेबाज व चालबाज सरकारला हद्दपार करा"; नाना पटोलेंची टीका
By कमलेश वानखेडे | Published: December 11, 2023 08:17 PM2023-12-11T20:17:43+5:302023-12-11T20:17:57+5:30
विधिमंडळावर मोर्चाद्वारे शक्तीप्रदर्शन करीत काँग्रेसचा ‘हल्लाबोल’
कमलेश वानखेडे, नागपूर: शेतकरी, बेरोजगारी व महागाईच्या प्रश्नांची बधीर सरकार दखलच घेत नाही. उलट ‘शासन आपल्या दारी’ च्या नावावर सरकारची तिजोरी खाली करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता या खोकेबाज, धोकेबाज व चालबाज सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करा, असे आवाहन करीत काँग्रेस नेत्यांनी महायुती सरकार विरोधात हल्लाबोल केला.
प्रदेश काँग्रेसतर्फे सोमवारी विधिमंडळावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. दीक्षाभूमीवरून निघालेला हजारोंचा मोर्चा मॉरीस कॉलेज टी पॉईंट येथे पोहचल्यावर त्याचे जाहीर सभेत रुपांतर झाले. मोर्चात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, तेलंगणाचे प्रभारी माजी आ. माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री आरिफ नसीम खान, नितीन राऊत, सुनील केदार, यशोमती ठाकूर, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आ. वर्षा गायकवाड, सतेज पाटील, आ. प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, नागपूर शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत, राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांच्यासह राज्यभरातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी पटोले म्हणाले, मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सरकार राज्यात सामाजिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारच्या इशाऱ्यावर दंगली घडविण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे. तीन राज्याच्या निकालाने भाजप हुरळून गेली आहे. मात्र, महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात काँग्रेसचा विजय झाला आहे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता उलथूून टाकण्याचे हे संकेत आहेत. भाजपमध्ये जर हिम्मत असेल तर त्यांनी मुंबईसह राज्यभरातील महापालिकेच्या निवडणुका लावून दाखवाव्या, असे आव्हान पटोले यांनी दिले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी तीन कायदे आणले होते. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे ते त्यांना परत घ्यावे लागले. त्यामुळेच शेतकऱ्यांवर सूड काढणे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. अशोक चव्हाण म्हणाले, शेतकरी, बेरोजगारी, मराठा- ओबीसी आरक्षणाचे प्रश्न सुटले पाहिजेत. पण मंत्रीच वाद-प्रतिवाद करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम करीत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर आपली ‘व्होट बँक’ राखण्यासाठी ही धडपड सुरू असल्याची टीका त्यांनी केली. बाळासाहेब थोरात यांनी लोकशाही विरोधी सरकार घालविणे हेच अंतिम उद्दीष्ट असल्याचे सांगत यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या : पटोले
यावेळी नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पटोले म्हणाले, दुष्काळ, गारपीट, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. विमा कंपन्यांनी वसुली केली. मात्र, विमा कंपन्यांतील बडवे व बगलबच्च्यांनी सरकारमधील नेत्यांची घरं भरली, असा आरोप करीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
आता सत्तेत ८० चोर व दोन अलिबाबा : वडेट्टीवार
- राज्यात तीन तिघाडा, काम बिघाडा सरकार आहे. पूर्वी हे अलिबाब व ४० चोरांचे सरकार होते. आता ८० चोर व दोन अलिबाबा झाले आहेत, अशी शेलकी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. वडेट्टीवार म्हणाले, दुष्काळ, अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून अद्याप मदत मिळालेली नाही. बेरोजगारांना वाऱ्यावर सोडले आहे. मुख्य मुद्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी समाजांमध्ये भांडणे लावणे सुरू केले असल्याचे सांगत हे गद्दारांचे सरकार उखडून फेका, असे आवाहन त्यांनी केले.