महागड्या सिलिंडरने वाढविली रेस्टॉरंट मालकांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:08 AM2021-07-08T04:08:23+5:302021-07-08T04:08:23+5:30

नागपूर : कोरोना काळात दीड वर्षांत रेस्टॉरंट जवळपास आठ महिने बंद राहिल्याने आणि कच्चा माल व व्यावसायिक सिलिंडरचे दर ...

Expensive cylinders increase restaurant owners' concern | महागड्या सिलिंडरने वाढविली रेस्टॉरंट मालकांची चिंता

महागड्या सिलिंडरने वाढविली रेस्टॉरंट मालकांची चिंता

Next

नागपूर : कोरोना काळात दीड वर्षांत रेस्टॉरंट जवळपास आठ महिने बंद राहिल्याने आणि कच्चा माल व व्यावसायिक सिलिंडरचे दर तब्बल ४३५ रुपयांनी वाढल्याने रेस्टॉरंट मालकांची चिंता वाढली आहे.

गेल्या वर्षीपासून रेस्टॉरंटची बिघडलेली स्थिती अजूनही सुधारलेली नाही. यावर्षीही मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने बहुतांश दिवस रेस्टॉरंट बंद होते, तर यंदा वेळेच्या मर्यादेमुळे ग्राहकांची संख्या घटली आहे. लोक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील पदार्थांची खरेदी करणे टाळत आहेत. याशिवाय माल तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत दीडपटीने वाढ झाल्याने रेस्टॉरंट केवळ नावापुरतेच चालवावे लागत आहे. आता रेस्टॉरंटमध्ये नाश्ता आणि हॉटेलमध्ये जेवण महाग झाले आहे. त्यातच रेस्टॉरंटला लागणाऱ्या व्यावसायिक सिलिंडरची (१९ किलो) वर्षभरात ४३५ रुपयांनी वाढ झाली आहे. महागाई वाढल्याने कर्मचारी पगारवाढीची मागणी करीत आहेत. याशिवाय विजेचे दर, प्रॉपर्टी कर, पाण्याचे बिल आदींची वाढ झाली आहे. ना नफा, ना तोटा, या तत्त्वावर रेस्टॉरंट सुरू आहे. कधी कधी पदार्थ उरल्यास तोटाही सहन करावा लागतो. सध्या सण नसल्याने मिठाईला मागणी कमीच आहे. या सर्व कारणामुळे रेस्टॉरंट चालवावे वा नाही, या चिंतेत बहुतांश रेस्टॉरंट मालक असून, अनेकांनी काही दिवसासाठी रेस्टॉरंट बंद केल्याची माहिती नंदनवन येथील राम भंडारचे मालक वसंत गुप्ता यांनी दिली.

पदार्थांच्या किमती वाढविण्याची जोखीम

भाज्या, खाद्यतेल आणि डिझेल वाढल्याने सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. फिनिश मालाच्या वस्तूंची किमत २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. अशा महागाईत मालाच्या किमती वाढविणे ही एक जोखिमच आहे. किंमत वाढविल्यास खर्च निघणे कठीण होणार आहे. लोकांची खरेदी कमी झाली आहे. त्यातच भाव वाढविल्यास लोक खरेदीसाठी येणार नाहीत, अशी भीती वाटते. त्यामुळे वर्षापासून पदार्थांच्या किमती वाढविल्या नाहीत. निरंतर वाढत्या महागाईत रेस्टॉरंट चालविणे कठीण झाल्याचे गुप्ता म्हणाले.

नागपुरात पाच हजारांपेक्षा जास्त रेस्टॉरंट

नागपुरात नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत तसेच हातठेल्यावर खाद्यपदार्थांची विक्री होणारे जवळपास पाच हजारांपेक्षा जास्त रेस्टॉरंट आहेत. त्यातील अनेक बंद पडले आहेत. नंदनवन भागात हातठेल्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणारे सुहास बुटले म्हणाले, कोरोना संकटानंतर खाद्यपदार्थांची विक्री अर्ध्यापेक्षा कमी झाली आहे. त्यात मनपा प्रशासनाचे दुपारी ४ वाजता दुकान बंद करण्याचे निर्देश असल्याने दंड आकारण्याची भीती आहे. त्यामुळे अनेकदा नफा तर सोडा कच्च्या मालाचीही किंमत निघत नाही. गेल्या वर्षी सहा महिने व्यवसाय बंद होता. त्यामुळे कुटुंबीयांचा खर्च चालविण्याची चिंता होती. यावर्षीही तीच चिंता सतावत आहे. प्रशासनाने वेळेची मर्यादा हटवावी.

Web Title: Expensive cylinders increase restaurant owners' concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.