ट्रान्सपोर्टेशन कॉस्टच्या नावावर महागडे पेट्रोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:49 AM2018-06-05T00:49:56+5:302018-06-05T00:50:14+5:30
देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर नागपूर शहरात आहे. ५-७ पैशाची क्षुल्लक घट करण्यात आल्यानंतरही पेट्रोलची किंमत ८६ रुपयांवर आहे. व्हॅट, सेस व अन्य करांसोबतच एक आणखी कारण आहे, ज्यामुळे नागपूरकरांना पेट्रोलची जास्त किंमत मोजावी लागत आहे. पेट्रोल कंपन्या हा छुपा दर ट्रान्सपोर्ट कॉस्टच्या नावाने वसूल करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर नागपूर शहरात आहे. ५-७ पैशाची क्षुल्लक घट करण्यात आल्यानंतरही पेट्रोलची किंमत ८६ रुपयांवर आहे. व्हॅट, सेस व अन्य करांसोबतच एक आणखी कारण आहे, ज्यामुळे नागपूरकरांना पेट्रोलची जास्त किंमत मोजावी लागत आहे. पेट्रोल कंपन्या हा छुपा दर ट्रान्सपोर्ट कॉस्टच्या नावाने वसूल करीत आहे. यासंदर्भात लोकमतने सर्वे केल्यावर असे निदर्शनास आले की, तीनही कंपन्यांमध्ये पेट्रोलच्या दरात ४ ते ६ पैशाचे अंतर दिसून आले. आग्याराम देवी चौकातील एचपीचा पेट्रोल पंप, बैद्यनाथ चौकातील भारत पेट्रोल पंप, मेडिकल चौकातील इंडियन आॅईलच्या पेट्रोल पंपावर तफावत दिसून आली. यात एचपीसीएलचे पेट्रोल सर्वाधिक महाग होते.
खापरी डेपो येथून तेलाचा पुरवठा बंद झाला आहे. इंडियन आॅईलच्या दहेगाव (अकोला) डेपोतून पेट्रोलियम पदार्थाचा पुरवठा होत आहे तर एचपीच्या पेट्रोलियम पदार्थाचा पुरवठा तडाळी (चंद्रपूर) डेपोतून होत आहे. तर बोरखेडी येथील डेपोतून भारत पेट्रोलियमचा पुरवठा होत आहे. तीनही कंपन्यांच्या ट्रान्सपोर्टेशन टेंडरमध्ये सर्वात महाग इंडियन आॅईलचे टेंडर आहे. त्यानंतरही हे पेट्रोल ‘एचपी’ कंपनीच्या पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे.
टॅक्सचा बोजा
पेट्रोलियम पदार्थाचे दर ठरविताना सरकारने कुठलीही सूट दिली नाही. रस्त्याच्या नावावर वाहनचालक तीन प्रकारचा टॅक्स देत आहे. सेंट्रल रोड फंड १ रुपयावरून ८ रुपये करण्यात आला आहे. वाहन खरेदी करताना रोड टॅक्सच्या नावावर आरटीओमध्ये भरण्यात येत असलेल्या फीबरोबरच प्रत्येक नाक्यावर टोल टॅक्सच्या रूपातसुद्धा वसुली करण्यात येत आहे.
किमतीवर लक्ष
२०१७ मध्ये दैनिक मूल्य संशोधन नियमानुसार पेट्रोल कंपन्यांनी आपल्या हिशेबाने पेट्रोलच्या कि मती ठरविल्या आहेत. सोमवारी भारत पेट्रोलियमच्या पेट्रोलचा दर ८६.२५ रुपये, इंडियन आॅईलचा दर ८६.२६ रुपये व एचपी पेट्रोलचा दर ८६.२९ रुपये होता.
खासगी कंपन्यांचे पेट्रोल आणखी महाग
या तीन कंपन्यांबरोबरच शहरात दोन खासगी कंपन्यांचे पेट्रोल पंप आहेत. रिलायन्स व एस्सार या कंपन्यांच्या पेट्रोल पंपाला मुंबईतून पेट्रोलियम पदार्थाचा पुरवठा होतो. या दोन्ही कंपन्यांचे आसपास कुठलेही डेपो नाही. त्यामुळे या कंपन्यांची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आणखी वाढते. बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएल कंपन्यांपेक्षा रिलायन्सच्या पेट्रोलची किंमत किमान २० पैसे व एस्सारचे पेट्रोल २५ पैशांनी महाग आहे.