'या' कारणासाठी तो चोरायचा महागड्या स्पोर्ट बाईक ..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 09:42 AM2020-07-04T09:42:41+5:302020-07-04T09:43:02+5:30
पोलिसांच्या सापळ्यात अडकल्यानंतर आरोपी शरद तो मी नव्हेच ची भूमिका वठवू लागला. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी कोवे यांच्या मालकीची स्पोर्ट बाईक जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महागड्या स्पोर्ट बाईक चोरून त्याची विल्हेवाट लावणारा कुख्यात गुन्हेगार शरद शामराव कातलाम (वय २२) याच्या बेलतरोडी पोलिसांनी मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीची केटीएम आरसी ही महागडी स्पोर्ट बाईक जप्त करण्यात आली.
शरद कातलाम याला महागड्या स्पोर्ट बाईक चालविण्याचा शौक आहे. तो आपला शौक पूर्ण करण्यासाठी नजरेत भरलेली महागडी स्पोर्ट बाईक चोरतो आणि तिच्यावर सैरसपाटा करतो. त्याने २२ जूनला बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संकेत दिगंबर कोवे (रा. मनीषनगर, सोमलवाडा) यांची एक लाख रुपये किमतीची बाईक चोरली. २२ जूनला ही चोरी केल्यानंतर आरोपी शरद दडून बसला. कोवे यांनी या चोरीची तक्रार २९ जूनला बेलतरोडी पोलिसांकडे नोंदविली.
शहरात अशा प्रकारच्या अनेक महागड्या स्पोर्ट बाईक चोरीला जाण्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. त्यामुळे या तक्रारीची दखल घेत पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत यांनी एक पथक या चोरीचा छडा लावण्यासाठी कामी लावले. घटनास्थळ परिसरातून अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. त्या आधारे आरोपी शरदचा माग काढून अखेर शुक्रवारी त्याला घेरण्याची पोलिसांनी योजना बनविली. पोलिसांच्या सापळ्यात अडकल्यानंतर आरोपी शरद तो मी नव्हेच ची भूमिका वठवू लागला. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी कोवे यांच्या मालकीची स्पोर्ट बाईक जप्त केली.
तरुणींना इमप्रेस करण्यासाठी
कुख्यात शरद हा सराईत गुन्हेगार आहे. तो चिंचभवन परिसरातील रहिवासी असला तरी गुन्हा केल्यानंतर पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून तो वाडीच्या शिवाजीनगरात भाड्याच्या खोलीत राहतो. तो नुकताच कारागृहातून बाहेर आला आणि पुन्हा त्याने गुन्हेगारी सुरू केली. फुटाळा अंबाझरी आणि विविध ठिकाणी जेथे तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणावर फिरायला येतात अशा ठिकाणी तो महागडी स्पोर्ट बाईक घेऊन फिरतो आणि मुलींना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. बेलतरोडी पोलिसांनी आज त्याला फुटाळा तलाव परिसरातून ताब्यात घेतले.