महागड्या शस्त्रक्रिया आता गरीबांच्या कक्षेत : संजीव कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:13 AM2019-09-18T00:13:21+5:302019-09-18T00:15:08+5:30
हृदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, गुडघा प्रत्यारोपण व ‘हिप जाईंट’ प्रत्यारोपण सारख्या महागड्या शस्त्रक्रिया गरिबांच्या कक्षेत आल्या आहेत, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना फायद्याची ठरत आहे. विशेषत: या दोन्ही योजनांमुळे एकेकाळी हृदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, गुडघा प्रत्यारोपण व ‘हिप जाईंट’ प्रत्यारोपण सारख्या महागड्या शस्त्रक्रिया गरिबांच्या कक्षेत आल्या आहेत, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले. ‘इंडियन सोसायटी ऑफ स्टडी ऑफ पेन’ नागपूर ‘ददराडिया पेन इन्स्टिट्यूट’ कोलकाता यांच्या सहकार्याने ‘आयसीआरए-पेन २०१९’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे शनिवारी एका खासगी हॉटेलमध्ये उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला परिषदेचे आयोजन अध्यक्ष डॉ. सी.एस. चाम, आयोजन सचिव डॉ. सुनीता लवंगे, डॉ. गौतम दास, डॉ. बी.एम. राजुरकर, डॉ. अंजली कोल्हे आदी उपस्थित होते. डॉ. संजीव कुमार यांनी यावेळी आरोग्यावरील शासनांच्या योजनांची माहिती देऊन जास्तीत लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले. यावेळी उपस्थितांचे स्वागत डॉ. चाम यांनी केले. परिषदेमागील भूमिका परिषदेचे संरक्षक डॉ. दास यांनी मांडली. कार्यक्रमाला डॉ. प्रतिभा देशमुख, डॉ. एस.पी. मांजरेकर, डॉ. शेलगावकर, डॉ. उमेश रमतानी डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. अर्चना मुनिश्वर, डॉ. देवयानी ठाकूर, डॉ. हेमा शिर्के, डॉ. किरण व्यवहारे, डॉ. निलोफर शकीर, डॉ प्रिया सदावर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन डॉ. देवयानी ठाकूर व डॉ. उमेश रमतानी यांनी केले. डॉ. सुनीता लवंगे यांनी आभार मानले. यावेळी विविध वैज्ञानिक सत्रामध्ये दीर्घकालीन वेदनांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व्यवस्थापन कसे करावे, यावर प्रकाश टाकण्यात आला. त्याच प्रकारे रेडियो फ्रिक्वेंसीच्या माध्यमातून उपचार करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. ‘क्लिनिकल इव्हॅल्युएशन ऑफ पेशंट ऑफ पेन’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चालणाºया या परिषदेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञासह २५० फिजिशियन तसेच अॅनेस्थेशिया तज्ज्ञ सहभागी झाले आहेत.