अनुभवींच्या ज्ञानाचा उपयोग जंगल संरक्षणासाठी व्हावा
By admin | Published: November 17, 2014 12:55 AM2014-11-17T00:55:15+5:302014-11-17T00:55:15+5:30
गेली ४० वर्षे कुतूहलापोटी जंगलांचा अभ्यास केला. या अभ्यासातून अनेक गूढ वाटणाऱ्या बाबी समोर आल्या. यातूनच काही निष्कर्षही अभ्यासाअंती मांडले आणि हे निष्कर्ष सातत्याने तपासून सिद्ध केले.
नागपूर : गेली ४० वर्षे कुतूहलापोटी जंगलांचा अभ्यास केला. या अभ्यासातून अनेक गूढ वाटणाऱ्या बाबी समोर आल्या. यातूनच काही निष्कर्षही अभ्यासाअंती मांडले आणि हे निष्कर्ष सातत्याने तपासून सिद्ध केले. गेल्या ४० वर्षांच्या अनुभवातून अधिकाराने एक सांगावेसे वाटते, मानवी आयुष्यासाठी आणि पर्यावरणाच्या समृद्धतेसाठी जंगलांचे संरक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. पण औद्योगिकरणाच्या आणि विकासाच्या नावाखाली जंगले संपत चालली आहे. जंगलांचे संरक्षण करण्यासाठी जंगलांचा अभ्यास आणि अनुभव असणाऱ्या तज्ज्ञांच्या ज्ञानाचा उपयोग शासनाने केला पाहिजे. यासाठी आपण मदत करायला तयार आहोत, असे आवाहन ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ आणि अरण्यवाचक मारुती चितमपल्ली यांनी केले.
स्वरसाधना व सरकारी आणि गैरसरकारी स्वयंसेवी संस्थांच्या वतीने श्रीमंत पूर्णचंद्र बुटी सभागृहात रविवारपासून त्रिदिवसीय ‘आपली वसुंधरा’ या पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे़ या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी स्वागताध्यक्ष महापौर प्रवीण दटके, अध्यक्ष डॉ़ पिनाक दंदे, स्वरसाधनेचे कार्याध्यक्ष आ़ अनिल सोले, अध्यक्ष श्याम देशपांडे, महाराष्ट्राचे प्रधान वनसंरक्षक अनिलकुमार सक्सेना, मार्डीकर, राष्ट्रीय मृदा, सर्वेक्षण व भूमी उपाययोजनेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ़ त्रिलोक हजारे, प्रदर्शनाचे संयोजक प्रा़ विजय घुगे व चैतन्य मोहाडीकर उपस्थित होते़ मारुती चितमपल्ली म्हणाले, लोकसंख्येचे प्रमाण वाढते आहे. त्याच प्रमाणात जंगलांचे प्रमाणही वाढणे गरजेचे आहे. लोकसंख्या वाढते आहे आणि जंगलांचे प्रमाण कमी होते आहे, ही मानवी आयुष्यासाठीच धोक्याची घंटा आहे. महाबळेश्वरला ३० वर्षापूर्वी ४०० इंच पाऊस पडायचा़ गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण २०० इंचावर आले आहे़ गेल्या ३०-४० वर्षात महाराष्ट्रातील ५० टक्के जंगलच नाहिसे झाले आहे. विदर्भातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया भागात ३० हजारावर तळी आहेत़ या तळ्यांवर घातक बेशरम गवताचे जंगल वाढल्याने पाण्याचा स्रोत कमी झाला आहे आणि डासांचे साम्राज्य वाढतेय़ वाघांच्या संरक्षणासाठी कॅरिडॉर असणे अत्यंत आवश्यक आहे पण त्याकडे दुर्लक्ष होते आहे. सरकारला सुचविलेल्या अनेक बाबींवर अजून काम झाले नाही.केवळ सरकारवर अवलंबून न राहता स्वयंसेवी संस्था व वन्यप्रेमींनी आता पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी चितमपल्ली यांनी केले. महापौर दटके म्हणाले, महानगरपालिकेची नसणारी कामेही आता पर्यावरणासाठी महापालिका करत आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचे संतुलन राहावे म्हणून महापालिकेने पुढाकार घेतला आहे. महाविद्यालयानी जीवनात पर्यावरण राखणे किती महत्वाचे आहे, ते कळत नव्हते. पण आज ती किती मोठी गरज आहे, याची जाणीव होते. त्यामुळेच शहराबाहेरुन येणाऱ्या नागनदीला स्वच्छ करण्याचे अभियान मनपाने राबविले आहे. जनतेने या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. आ. अनिल सोले यांनी प्रदर्शनाच्या आयोजनाला शुभेच्छा देत सर्व नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक चैतन्य मोहाडीकर यांनी केले. संचालन डॉ़ कल्पना उपाध्याय यांनी तर आभार प्रा़ विजय घुगे यांनी मानले़ (प्रतिनिधी)