नृत्य आणि संगीतातून केली ऋतुसंहाराची अनुभूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 01:24 AM2019-01-31T01:24:09+5:302019-01-31T01:25:32+5:30
कालिदासांनी रचलेल्या ऋतुसंहार या महाकाव्यात सहा ऋतूंच्या सहा सोहळ्याचे वर्णन केले आहे. सहा ऋ तूंच्या याच सहा सोहळे नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून सोमलवार हायस्कूल निकालस शाखेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय मनमोहक अनुभूती करून दिली आहे. ‘रसरंग’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुलाबी थंडीत ऋतुसंहारातील निसर्गाच्या विविध छटांचे मनमोहक दर्शन या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे घडविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कालिदासांनी रचलेल्या ऋतुसंहार या महाकाव्यात सहा ऋतूंच्या सहा सोहळ्याचे वर्णन केले आहे. सहा ऋ तूंच्या याच सहा सोहळे नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून सोमलवार हायस्कूल निकालस शाखेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय मनमोहक अनुभूती करून दिली आहे. ‘रसरंग’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुलाबी थंडीत ऋतुसंहारातील निसर्गाच्या विविध छटांचे मनमोहक दर्शन या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे घडविले.
या कार्यक्रमाला कलाशिक्षक डॉ. श्रीराम बाभुळकर, विकास जोशी, प्रसिद्ध नृत्यांगणा रत्नम जनार्दन नायर, अवनी काटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच सोमलवार शिक्षण संस्थेचे अॅड. मधुकर सोमलवार, प्राचार्य विवेक जोशी, पर्यवेक्षक दामोदर ठोंबरे यांचीही उपस्थिती होती. या विद्यार्थ्यांनी कालिदासाने रचलेले ऋतुसंहार हे काव्य चित्र, नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या पद्धतीने मांडले. शाळेच्या पटांगणात ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर आणि वसंत ऋतूत सृष्टीत प्रकट होणारे रंग, निसर्गाचे सौंदर्य, सण सोहळे क्राफ्ट आणि चित्रकलेच्या माध्यमातून साकारले. त्याचबरोबर रसरंग या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक ऋतूची नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून अनुभूती करून दिली. गणेशवंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कालिदासाचे महत्त्व विशद करण्यात आले. त्यानंतर ग्रीष्म ऋतूचे आगमन मंचावर झाले. सूर्याच्या प्रखर किरणांमुळे होरपळून गेलेल्या सृष्टीत प्राणी पक्ष्यांची झालेली जीवाची काहिली, तहानलेल्या जीवांची कासाविस विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या नृत्यातून सादर केली. ग्रीष्मात येणाऱ्या वटसावित्रीच्या सणाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश यावेळी दिला. त्यानंतर वर्षा ऋतूचे आगमन झाले. संपूर्ण पृथ्वीवर चहुकडे हिरवळ दाटली, पक्षीप्राण्यांची चिवचिवाट सभोवताली दाटली, मेघ गरजले, वायुसंगे वृक्षांचे नर्तन सुरू झाले. हा सर्व आनंददायी निसर्गाचा सोहळा विद्यार्थ्यांनी ‘वर्षा ऋतुची राज सवारी रसिक मना आवडे...’ या गीतावर विलोभनीय नृत्य सादर करून उपस्थित रसिकांना त्याची अनुभूती करून दिली. अशाच पद्धतीने इतरही ऋतूंचे संगीत आणि नृत्यातून विद्यार्थ्यांनी वर्णन केले. निसर्गाचा एक आगळावेगळा ऋतुसंहार या कार्यक्रमात उपस्थित रसिकजनांनी मनमुराद अनुभवला.